अमरावतीत ढगफुटी; ३३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 17:46 IST2025-08-16T17:45:27+5:302025-08-16T17:46:13+5:30
Amravati : तिवसा तालुक्यात दीडशे हेक्टर शेतजमीन खरडली, १० घरांची पडझड, शेतीपिकांचे प्रचंड नुकसान

Cloudburst in Amravati; Heavy rainfall recorded in 33 revenue circles
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती/तिवसा : जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पावसाने ३३ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यांमध्ये पावसाने शतक पार केले.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील दत्तापूर महसूल मंडळात १४६ मि.मी., धामणगाव १२० मि.मी., अंजनसिंगी १०९.२५ मि.मी., मंगरूळ दस्तगीर १०४.५ मि.मी., भातकुली ८८.७५ मि.मी., तळेगाव दशासर ६८.७५ मि.मी., चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदूर, पळसखेड व आमला महसूल मंडळात प्रत्येकी ११७.२५ मि.मी., सातेफळ ११४.७५ मि.मी., घुईखेड ६८.७५ मि.मी., अमरावती तालुक्यातील अमरावती, नवसारी व वडाळी मंडळात प्रत्येकी ८५.५ मि.मी., शिराळा ७३.७५ मि.मी., वलगाव ७३.२५ मि.मी., बडनेरा ६८.२५ मि.मी., माहुली व नांदगाव पेठ ६५ मि.मी., तिवसा तालुक्यातील वरखेड मंडळात ७५ मि.मी., कुन्हा ८५ मि.मी., मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर मंडळात ७३.५ मि.मी., अचलपूर तालुक्यातील असदपूर मंडळात ६५ मि.मी., चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा मंडळात ७३.५ मि.मी. भातकुली तालुक्यातील पूर्णानगर मंडळात ७३.७५ मि.मी., आष्टी ७३.२५ मि.मी., भातकुली ७२ मि.मी., आसरा ६८.५ मि.मी., नांदगाव तालुक्यातील दाभा व लोणी मंडळात ६८.२५ मि.मी पावसाची नोंद झाली.
खोलाड नाल्याच्या पुरात इसमाचा मृत्यू
मंगरूळ दस्तगीर : शेतातून परतणारे महादेवराव गाडेकर (६५, रा. पेठ रघुनाथपूर) हे खोलाड नाल्याच्या पुरात वाहत गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पाण्याचा ओढ जास्त असल्याने ते वाहत गेले.
थिलोरी गावात शिरले नाल्याचे पाणी
दर्यापूर : तालुक्यात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांचा पूर शेतात-गावातही शिरला. थिलोरी लखापूर गावातून वाहणाऱ्या नाल्याचे भरून वाहत असल्याने गावात पाणी शिरले. दुसरीकडे नाले तुडुंब भरून वाहत असल्याने नाल्यालगत असलेल्या शेतामध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. थिलोरी लखापूर गावातून वाहणाऱ्या लेंडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नाल्याजवळील रहिवासीसुद्धा सतर्क झाले आहेत. थिलोरी गावात पाणी नाल्याचे पाणी दरवर्षी शिरते.
नुकसानाचे तत्काळ पंचनामे करा - अडसड
धामणगाव रेल्वे : मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात बुधवारी झालेल्या अतिवृष्टी व संततधार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आ. प्रताप अडसड यांनी तालुका प्रशासनाला दिले आहेत. कृषी सहायक, तलाठी ग्रामसेवक यांची समिती नेमून पंचनामे करावे व जिल्हा प्रशासनाला तात्काळ अहवाल पाठवावा, असे तिन्ही तहसीलदारांना त्यांनी निर्देश दिले. त्याप्रमाणे तिन्ही तालुक्यात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.
"दोनही मंडळात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यात आला आहे. नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करण्यासाठी आदेश देण्यात आले आहे."
- डॉ. मयूर कळसे, तहसीलदार तिवसा.