जिल्हाधिकारी : महसूल कर्मचारी एकता संघातर्फे रक्तदान शिबिर
अमरावती :अपघात किंवा अन्य दुर्धर व गंभीर आजारात रुग्णांना रक्ताची गरज भासते. कोविडकाळात उपचारादरम्यान रक्ताची पुरेशी उपलब्धता असावी, गरजूंना प्लाझ्मा उपलब्ध व्हावा, यासाठी सजग राहून रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
अमरावती जिल्हा महसूल कर्मचारी एकता संघातर्फे मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात प्लाझ्मा व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी नवाल यांनी प्रथम रक्तदान करून शिबिराचा प्रारंभ केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महसूल कर्मचारी एकता संघातर्फे प्लाझ्मा व रक्तदान शिबिर आयोजित केले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अविनाश उकंडे व त्यांची चमू यावेळी उपस्थित होती. प्लाझ्मा उपलब्धतेसाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न होत आहेत. याच पार्श्वभूमीवर संघाने पुढाकार घेत हे शिबिर आयोजित केले आहे, अशी माहिती संघाचे सचिव गजानन उगले यांनी दिली.
गतवर्षीही कोरोनाकाळ लक्षात घेऊन याप्रकारचे शिबिर आयोजित केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा शिबिरांच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉ. अविनाश उकंडे यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे सदस्य विजय सांगळे, पंकज खानझोडे, किशोर धवने, प्रमोद काळे, सतीश कापडे, गजानन भेंडेकर, सहदेव चाटे, रामप्रसाद डोळे, तुषार निंभेकर, शिवाजी जाधव, सचिन पवार उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सत्कार
रक्तदानाला कर्तव्य मानणाऱ्या आणि सामाजिक बांधीलकी जोपासत नियमित रक्तदान करणाऱ्यांचा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक गजेंद्र मालठाणे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अविनाश उकंडे व चमू, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भामत, संघटनेचे सचिव गजानन उगले यांचा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.