चुरशीची लढत, अपक्ष किरण सरनाईक विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:00 AM2020-12-05T05:00:00+5:302020-12-05T05:00:56+5:30

४० तास निरंतर चाललेल्या मतमोजणी प्रक्रियेत पहिल्या पसंतिक्रमाच्या आणि दुसऱ्या पसंतिक्रमाच्या मतगणनेच्या एकूण २६ फेऱ्या पार पडल्या. २७ उमेदवारांसाठी एकूण ३०,९१८ मते मोजली गेली. यातील १०८९ अवैध आणि २९,८२९ मते वैध ठरली. प्रथम पसंतिक्रमाच्या फेरीत १४,९१६ मतांचा ‘क्वालिफाइंग कोटा’ (विजयासाठी आवश्यक मते) २७ पैकी एकाही उमेदवाराने पूर्ण केला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतिक्रमाच्या मतांची मोजणी सुरू करण्यात आली.

Churshi fight, independent Kiran Sarnaik won | चुरशीची लढत, अपक्ष किरण सरनाईक विजयी

चुरशीची लढत, अपक्ष किरण सरनाईक विजयी

Next
ठळक मुद्देशिक्षक मतदारसंघ; महाआघाडीचे श्रीकांत देशपांडे दुसऱ्या, अपक्ष शेखर भोयर तिसऱ्या स्थानी

  लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उत्कंठावर्धक ठरलेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी अनपेक्षित विजय संपादन करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मूळचे वाशिम जिल्ह्यातील सरनाईक यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार महाआघाडीचे श्रीकांत देशपांडे यांच्यापेक्षा ६४१५ मताधिक्य घेऊन विजय संपादन केला. श्रीकांत देशपांडे ९१९१ मते घेऊन दुसऱ्या स्थानी, तर अपक्ष उमेदवार शेखर भोयर ६४५४ मतांसह तिसऱ्या स्थानी आहेत. सरनाईक यांनी २६  व्या फेरीअखेर दुसऱ्या पसंतीच्या मतांचा ‘क्वॉलिफाईंग कोटा’ पूर्ण केला. 
४० तास निरंतर चाललेल्या मतमोजणी प्रक्रियेत पहिल्या पसंतिक्रमाच्या आणि दुसऱ्या पसंतिक्रमाच्या मतगणनेच्या एकूण २६ फेऱ्या पार पडल्या. २७ उमेदवारांसाठी एकूण ३०,९१८ मते मोजली गेली. यातील १०८९ अवैध आणि २९,८२९ मते वैध ठरली. प्रथम पसंतिक्रमाच्या फेरीत १४,९१६ मतांचा ‘क्वालिफाइंग कोटा’ (विजयासाठी आवश्यक मते) २७ पैकी एकाही उमेदवाराने पूर्ण केला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतिक्रमाच्या मतांची मोजणी सुरू करण्यात आली. या प्रक्रियेत सर्वाधिक कमी मते प्राप्त केलेले उमेदवार मतगणना प्रक्रियेतून बाद केले जातात. बाद उमेदवारांच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या क्रमांकाची मते ज्या इतर उमेदवाराच्या नावे असतील, त्या उमेदवाराच्या एकूण मतांमध्ये समाविष्ट केली जातात. या पद्धतीच्या फेरीला त्यामुळेच  ‘बाद फेरी’ असेही संबोधतात. २६ व्या बाद फेरीअंती किरण सरनाईक यांना १५६०६ इतकी मते मिळाली.  १४९९६ मतांचा क्वालिफाईंग कोटा त्यांनी पूर्ण केला. 

मेळाव्यांद्वारे शिक्षकांशी संपर्क साधणार - सरनाईक

विभागातील पाचही जिल्ह्यांत मेळाव्यांद्वारे शिक्षकांशी संपर्क साधणार. याशिवाय वैयक्तिक भेटदेखील घेणार. महाआघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने या मतदारसंघात इतिहास घडल्याचे विजयी उमेदवार किरण सरनाईक म्हणाले. माणसाचा अंत पाहणारी ही मतमोजणीची प्रक्रिया आहे. अधिकृत घोषणेला कदाचित रात्रीचे २ ही वाजू शकतात. येत्या सहा वर्षांत प्रत्येक समस्येचा निपटारा करण्याचा प्रयत्न राहणार आहे. आपणा सर्वांकडून प्रेम, वात्सल्य व सूचना पाहिजे, असे सरनाईक म्हणाले.

रटाळ प्रक्रिया, ४० तासांवर वेळ
शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रक्रिया ही ‘एकल संक्रमण’ पद्धतीने असते. ही क्लिष्ट व रटाळ प्रक्रिया असल्याची अनेक उमेदवारांची प्रतिक्रिया होती. गुरुवारी सकाळी ६ वाजता सुरू झालेली प्रक्रिया शुक्रवारी रात्री उशिरा किमान ४० तासांपर्यंत सुरू होती.

एकाच टेबलवर मतमोजणी
निवडणुकीत बाद फेरीतील उमेदवारांची मतमोजणीची प्रक्रिया ही एका हॉलमधील एकाच टेबलवर घेण्यात आली. त्यामुळे अन्य उमेदवारांच्या पसंतीच्या मतांची निश्चिती करण्याला वेळ लागला. यामुळेच मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया रेंगाळल्याचे दिसून आले.

पंधराव्या फेरीनंतर वाढविले कर्मचारी 
मतमोजणीसाठी एका टेबलवर एक मतदान अधिकारी व दोन सहायक अशी व्यवस्था करण्यात आलेली होती. मात्र, पंधराव्या फेरीनंतर बाद फेरीतल्या उमेदवारांची मतसंख्या जास्त असल्याने मतमोजणीला विलंब लागत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने या टेबलवर सहाय्यासाठी कर्मचारी संख्या वाढविण्यात आली.

विजय निश्चितीविषयी संभ्रम
विजयासाठी १४९१६ मतांचा कोटा एकाही उमेदवाराला मिळत नसल्याने या पद्धतीविषयी एकवाक्यता नव्हती. अंतिम उमेदवार विजयी की २६ व्या उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात यावी, ती २७ व्या उमेदवाराच्या नावे जमा करण्यात येऊन विजयासाठी मतांचा कोटा मिळतो काय, याविषयी संभ्रम होता. 

बेरजेत भिन्नता, फेरमोजणीची मागणी
२४ व्या फेरीनंतर श्रीकांत देशपांडे यांच्यापेक्षा नऊ मतांनी आघाडी होती. नवीन फेरीला अवकाश असल्याने प्रतिनिधी बाहेर आले. मात्र, नंतर १७० मतांनी माघारल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार संशयास्पद असल्याने संगीता शिंदे यांच्या मतांची फेरमोजणी करण्याची मागणी शेखर भोयर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली. ही मागणी नाकारण्यात आली व लेखी देण्यात आले.

२० व्या फेरीमध्ये निर्णायक आघाडी
पहिल्या पसंतीच्या २० व्या फेरीमध्ये नीलेश गावंडे या उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची १०४२ मते अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांना मिळाली. ही आघाडी त्यांच्यासाठी निर्णायक ठरली. या फेरीनंतर अन्य उमेदवारांना मात्र मतांसाठी संघर्ष करावा लागल्याने चाहत्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसून आला.

 

Web Title: Churshi fight, independent Kiran Sarnaik won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.