छगन भुजबळ नाराज नाहीत, देवगिरीवरील बैठकींना नियमित हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 11:19 IST2025-02-28T11:17:36+5:302025-02-28T11:19:06+5:30
Amravati : मंत्री नरहरी झिरवाळ यांची स्पष्टोक्ती

Chhagan Bhujbal is not upset, he regularly attends meetings on Devagiri
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : छगन भुजबळ ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते नाराज नाहीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरील बैठकीला नियमित उपस्थित असतात, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
येथील विभागीय कार्यालयात आयुक्त प्रशासनाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. ना. झिरवाळ म्हणाले, प्रत्येकावर आरोप केला जातो म्हणजे त्यांचा राजीनामा घ्यावा, असे होत नाही. ना. कोकाटे आमदार असताना त्यांच्यावर कधी आरोप झालेला नाही, मंत्री झाल्यावर आरोप केला जातो. त्यांनी न्यायालयात अपील केले असल्याने त्यांच्यावर दोष सिद्ध झालेला नाही. ना. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बसून चर्चेअंती निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
मेळघाटात २२ दिवसांच्या चिमुकल्याला चटके दिल्याच्या प्रकारावर बोलताना ते म्हणाले. आदिवासी समाजामधील अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविला जाईल. अज्ञानात बदल व्हायला हवा, असे ते म्हणाले. विशेष सहाय्य योजनेत लाभार्थ्यांची संख्या वाढ व्हायला हवी. आता डीबीटीने थेट त्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात येणार असल्याची माहिती ना. झिरवाळ यांनी दिली.
नागपूरच्या लॅबचे महिनाभरात लोकार्पण
एफडीएद्वारा प्रत्येक विभागात एक प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात येणार आहे. याद्वारे नमुन्यांचे अहवाल लवकर मिळतील आणि सदोष नमुन्यांवर कारवाई करता येईल. नागपूर येथील लॅब तयार झालेली आहे. महिनाभरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिचे लोकार्पण होईल.
१९० पदांच्या लवकरच एफडीएमध्ये नियुक्ती
अन्न व औषध प्रशासनात बरीच पदे रिक्त आहेत. यासाठी विभागनिहाय आढावा घेत आहे. एमपीएससीद्वारा १२० पदांच्या परीक्षा घेण्यात आल्या. या पदांच्या नियुक्तीबाबत पाठपुरावा सुरू आहे. लवकरच ही पदे भरली जातील, असे ना. झिरवाळ म्हणाले.