लॉटरीच्या नावाखाली 'चक्री' जुगार! कोट्यवधींच्या फसवणुकीचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:22 IST2025-08-07T14:20:58+5:302025-08-07T14:22:13+5:30
Amravati : पीआय संदीप चव्हान यांच्या नेतृत्वात एपीआयद्वय अमोल कडू व महेशकुमार इंगोले यांच्या पथकाने दोन्ही कारवाई केल्या

'Chakri' gambling in the name of lottery! Fraud of crores exposed
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने ५ ऑगस्ट रोजी रात्री राजकमल चौकातील सीतारामबाबा मार्केट येथील एका ऑनलाईन लॉटरी सेंटरवर धाड टाकली. तेथे ऑनलाईन चक्री हा जुगार खेळविला जात होता. तेथून १.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. युनिट दोनने २० जून रोजी तेथील तीन लॉटरी सेंटरवर धाड घालत ३१ जणांना ताब्यात घेतले होते. त्यात धनराज रामरख्यानी या मालकाविरुद्धदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतरही तो ऑनलाईन लॉटरीआड 'चक्री' जुगार खेळवत असल्याचे मंगळवारच्या कारवाईने स्पष्ट झाले.
सीतारामबाबा मार्केट येथे काही ऑनलाईन लॉटरी सेंटरमध्ये फन टार्गेट, गोल्डन चान्स या वेबसाईटवर चक्री या जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार तेथे धाड केली असता तेथील जय लॉटरी या सेंटरमध्ये संगणकाच्या स्क्रीनवर फन टार्गेट वेबसाईटवर चक्री हा ऑनलाईन गेम सुरू असल्याचे दिसून आले. तेथे दोघेजण खेळवताना तर सहा जण खेळताना दिसून आले. तेथून धनराज रामरख्यानी (वय ५५, मनीपूर लेआऊट, अमरावती), रूपेश आलेकर (५०, अमरावती), ज्ञानेश्वर बेलोरकर (५०, वनारसी), सुनील पंजवानी (५९, रा. दस्तूर नगर), सतीश सावले (६०, रा. अंबापेठ, अमरावती), दिनेश लालवाणी (४०, रा. कंवर नगर), प्रकाश पिंजाणी (५६, रा.नविवस्ती बडनेरा) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून नगदी ३३ हजार ३६० रुपये व अन्य मुद्देमाल जप्त करून तो कोतवालीच्या ताब्यात देण्यात आला.
बेनाम चौकातील पानटपरीवरही 'ट्रॅप'
बडनेरा रोडवरील बेनाम चौक येथील एका कॉप्लेक्समधील पान सेंटर दुकानामध्ये ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या आड फन टार्गेटवरील चक्री या जुगारावरदेखील क्राईम युनिट दोनने धाड टाकली. तेथून राहुल मारोतराव बागळे (३४, रा. साईनगर) हा खेळविताना तर, तौफेल खान सलावत खान (रा. नमुनागल्ली) व महेश राजू खोडे (२७, रा. साईनगर) या दोघांना खेळताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून १ लाख २ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरूद्ध राजापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.