अमरावती : रेल्वे प्रशासनाने जुन्या साहित्याची विल्हेवाट लावत उत्पन्नाचा नवा उच्चांक गाठला आहे. मध्य रेल्वेने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून तब्बल ४५९.५२ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. विशेष म्हणजे, रेल्वे बोर्डाने दिलेले ४५० कोटींचे उद्दिष्ट ओलांडत मध्य रेल्वेने गेल्या दोन वर्षांतील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.
रेल्वेच्या विविध विभागांत पडून असलेले निकामी रूळ, लोखंडी सांगाडे, जुने डबे आणि तांत्रिक साहित्य यांची लिलावाद्वारे विक्री करण्यात आली. २०२३-२४ या आर्थिक वर्षानंतरची ही सर्वात मोठी कमाई ठरली आहे. यामुळे रेल्वेच्या आवारातील कचरा आणि भंगाराची विल्हेवाट तर लागलीच, पण तिजोरीतही मोठी भर पडली आहे. 'शून्य भंगार' मोहिमेला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.
मध्य रेल्वेच्या भांडार विभागाने कुर्ला कटिंग यार्ड, ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप (नाशिक), परळ वर्कशॉप आणि मनमाड वर्कशॉप यांसारख्या दुर्गम व विखुरलेल्या ठिकाणांसह, मध्य रेल्वेच्या सर्व पाचही विभागांमध्ये पडून असलेला भंगार माल शोधून काढण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी अत्यंत सखोल व सुसूत्र मोहिमा हाती घेतल्या आहेत. या केंद्रित प्रयत्नांमुळे विक्री कामगिरीमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे.
भुसावळ विभाग हा सर्वाधिक कामगिरी करणारा विभाग म्हणून समोर आला असून, त्याने १०५.३९ कोटी रुपयांच्या भंगार विक्रीची विक्रमी नोंद केली आहे; त्यानंतर माटुंगा कार्यशाळा (६८.३९ कोटी रुपये), नागपूर विभाग (६४.०२ कोटी रुपये), मुंबई विभाग (५५.४९ कोटी रुपये), पुणे विभाग (५० कोटी रुपये) आणि उर्वरित रक्कमेत इतर विभाग व उत्पादन घटकांचा वाटा आहे.
ठळक मुद्दे:
- एकूण महसूल: ४५९.५२ कोटी रुपये.
- लक्ष्य: ४५० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण.
- विक्रमी कामगिरी: गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक उत्पन्न.
- फायदा: रेल्वे परिसर स्वच्छ झाला आणि आर्थिक उत्पन्नात वाढ.
यामध्ये या बाबींचा समावेश आहे
- रेल्वे रूळ भंगार : ४७,५०२ मेट्रिक टन
- लोह-धातू भंगार : ३१,२९८ मेट्रिक टन
- लोह व्यतिरिक्त-धातू भंगार : ३,६१६ मेट्रिक टन
- स्लीपर्स : २,६५,६२५ नग
- रोलिंग स्टॉक : ५० लोकोमोटिव्ह्ज, ७८ डबे आणि १३७ वॅगन्स
Web Summary : Central Railway earns ₹459.52 crore from scrap sales, exceeding its target. The revenue came from selling discarded rails, coaches, and other materials. Bhusawal division led with ₹105.39 crore in sales. This initiative cleared railway premises and boosted revenue.
Web Summary : मध्य रेलवे ने भंगार की बिक्री से ₹459.52 करोड़ कमाए, जो लक्ष्य से अधिक है। यह राजस्व बेकार रेल, डिब्बे और अन्य सामग्री बेचकर प्राप्त हुआ। भुसावल मंडल ₹105.39 करोड़ की बिक्री के साथ सबसे आगे रहा। इस पहल से रेलवे परिसर साफ हुआ और राजस्व में वृद्धि हुई।