उमेदवारांची पहिली पसंती पारंपरिक चिन्हांनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:38 IST2021-01-08T04:38:52+5:302021-01-08T04:38:52+5:30
अमरावती : निवडणूक आयोगाने लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, हेडफोन यांसारख्या आधुनिक काळातील निवडणुकींना मान्यता दिली असली तरी सोमवारी झालेल्या चिन्हवाटपात ...

उमेदवारांची पहिली पसंती पारंपरिक चिन्हांनाच
अमरावती : निवडणूक आयोगाने लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, हेडफोन यांसारख्या आधुनिक काळातील निवडणुकींना मान्यता दिली असली तरी सोमवारी झालेल्या चिन्हवाटपात उमेदवारांनी पारंपरिक चिन्हांना पसंती दिल्याचे दिसून आले. अनेकांनी कपाट, सिलिंडर, टीव्ही, कपबशी, पुस्तक, टोपली, फॅन अशा दैनंदिन वापरातील वस्तूंच्या चिन्हांची निवड केली. आधुनिक साधने ग्रामीण भागातील जनतेच्या रोजनिशीतील नसल्याने नेहमी लक्षात राहणाऱ्या पारंपरिक चिन्हांवर उड्या पडल्याचे चित्र ४ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात दिसून आले.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये ५५३ ग्रामपंचायत निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. ४ जानेवारी हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर चिन्हांचे वाटप करण्यात आले. निवडणूक आयोगाने १९० चिन्हांचा पर्याय उमेदवारांपुढे दिला होता. त्यात ४० चिन्हे नवीन होती. आधुनिक काळाशी नाते सांगणारी ही चिन्हे असली तरी उमेदवारांनी त्यांना नापसंती दर्शविल्याचे दिसून आले. सर्व उमेदवार घरगुती वापराच्या वस्तूंचे चिन्ह घेत होते.
ग्रामीण भागात आधुनिक चिन्हांपेक्षा पारंपरिक चिन्ह फायदेशीर ठरेल, असा विचार करत अनेकांनी घरगुती वापरातील वस्तूंनाच पसंती दिली. त्यात सिलिंडर, पुस्तक, बॅट, ऑटोरिक्षा, कप-बशी, चष्मा, टोपली, टीव्ही, मिक्सर, शिवणयंत्र यांचा समावेश होता. चिन्हवाटप करताना तहसील कार्यालयात ग्रामपंचायतीच्या क्रमानुसार उमेदवारांना बोलाविले जात होते. त्यानंतर प्रभागनिहाय उमेदवारांना बोलावून त्यांच्या चिन्हाची पसंती नोंदवून चिन्हांचे वाटप केले जात होते. विशेष म्हणजे, निवडणूक अर्ज सादर करताना पसंतीचे पाच देण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. त्यामुळे आता गावागावांत या चिन्हांचा घोष करून मते मागितली जाणार आहेत