मद्याची वाहतूक रोखण्यासाठी इन कॅमेरा तपासणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 08:05 PM2019-09-22T20:05:55+5:302019-09-22T20:16:27+5:30

मध्यप्रदेश सीमेवर संयुक्त गस्त : वर्धा, यवतमाळ जिल्ह्याकडेही लक्ष

In camera inquiry to prevent transport of liquor | मद्याची वाहतूक रोखण्यासाठी इन कॅमेरा तपासणी  

मद्याची वाहतूक रोखण्यासाठी इन कॅमेरा तपासणी  

googlenewsNext
ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यात प्रवेशित राज्य व राष्ट्रीय महामार्गावर हे पथक गस्तीवर असणार आहे.अवैध दारू विक्री आणि मध्यप्रदेशात उत्पादित कमी महसूल आकारण्यात येणारी दारू आणण्यासाठी अनेकजण फंडा वापरतात.

गणेश वासनिक

अमरावती - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपाययोजना चालविल्या आहेत. निवडणुकीदरम्यान सीमेलगतच्या राज्यांतून अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग इन कॅमेरा तपासणी करणार आहे. तसेच ‘फ्लाइंग स्कॉड’चे गठन केले आहे. अमरावती जिल्ह्यात प्रवेशित राज्य व राष्ट्रीय महामार्गावर हे पथक गस्तीवर असणार आहे.
अवैध दारू विक्री आणि मध्यप्रदेशात उत्पादित कमी महसूल आकारण्यात येणारी दारू आणण्यासाठी अनेकजण फंडा वापरतात. मात्र, विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर केला जातो. त्याकरिता सीमेलगतच्या राज्यातून स्वस्त किंमतीची दारू आणली जाते, हे यापूर्वी एक्साईजने राबविलेल्या धाडसत्रातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथक असणार आहे. गत दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अवैध मद्य विक्री आणि पैशाची वाहतूक रोखण्यासाठी निर्देश दिले आहेत. त्यानुसार अमरावती येथील एक्साईजने तीन निरीक्षक असलेले ‘फ्लाइंग स्कॉड’ नेमले आहेत. मध्यप्रदेश सीमेसह आंध्रप्रदेशातून येणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. वाहनांची तपासणी करताना ती इन कॅमेरा केली जाणार आहे. विशेषत: यवतमाळ, वर्धा मार्गावरील वाहनांच्या तपासणीला प्राधान्य दिले जाणार आहे.

मद्य विक्रेत्यांची संयुक्त बैठक
अमरावती जिल्ह्यातील घाऊक व ठोक मद्य विक्रेत्यांची येत्या आठवड्यात दारू विक्री, साठवणूक आणि वाहतूक नियमांचे काटोकोरपण पालन होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग स्वतंत्र बैठक घेणार आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी चालविली आहे. दारू साठवणीच्या गोदामांवर सीसीटीव्ही बसविले जाणार आहे. दारू गोदामाची कोणत्याही क्षणी एक्साईजचे निरीक्षक अथवा अधीक्षक तपासणी करतील, अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एक्साईज नाक्यांवर इन कॅमेरा वाहनांची तपासणी केली जाणार आहे.

 

अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी फिरते पथक गठित करण्यात आले आहे. स्वतंत्र कर्मचारी नेमणूक होणार असून, नाक्यांवर जागते रहो, असे कर्तव्य बजावण्याचे निर्देश दिले आहे. विधानसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी एक्साईजने उपाययोजना चालविल्या आहेत. - राजेश कावळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अमरावती

Web Title: In camera inquiry to prevent transport of liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.