The body of the driver trapped in the vehicle | वाहनात फसला चालकाचा मृतदेह
वाहनात फसला चालकाचा मृतदेह

ठळक मुद्देविचित्र अपघात : तपोवन स्थित सुपर हाय-वे ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गाडगेनगर हद्दीतील तपोवन स्थित एक्सप्रेस हायवेवर उभ्या दहाचाकी ट्रकवर दोन ट्रक धडकल्याने एकाचा चालक ठार झाला. झाकरू अंतुजी नेवारे (४५, रा. दुर्गा धामणा, जि. नागपूर) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकच्या केबिनमध्ये चालकाचा मृतदेह फसला होता. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या मदतीने कटर मशीनद्वारे केबिन कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
पोलीस सूत्रानुसार, ट्रक क्रमांक एमएच २७ बीएक्स ७३७३ नागपूरकडून अकोलाकडे जात असताना तपोवनजवळील महामार्गावर बिघडला. ट्रकचालकाने साइन बोर्ड किंवा इंडिकेटर सुरू न ठेवता अर्ध्या रस्त्यात ट्रक उभा केला आणि केबिनमध्ये झोपला.
दरम्यान, पहाटे ४ वाजताच्या सुमारास नागपूरकडून अकोलाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक (एमएच ४० बीएल ५४२४) ने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या एमएच ४० एके १५२३ या क्रमांकाचा ट्रकसुद्धा अपघातग्रस्त ट्रकवर जाऊन धडकला. या विचित्र अपघातात एमएच ४० एके १५२३ क्रमांकाच्या ट्रकचा चालक झाकरू नेवारेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातात ट्रकचालक कॅबीनमध्ये फसला होता. त्यामुळे त्याला बाहेर काढणे कठीण झाले होते. त्यामुळे घटनास्थळी अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
अग्निशमन विभागाचे राजू शेंडे, नितीन इंगोले, फायरमन मनोज इंगोले, विशाल भगत, विकी हिवराळे यांनी हायड्रॉलिक कटर मशीनच्या साहाय्याने केबिन कापून झाकरू नेवारे यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यासाठी काही तासांचा अवधी लागला. तोपर्यंत या अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली तसेच काही वेळापुरती वाहतूक ठप्प झाली होती.
अपघाताची फिर्याद किशोर छत्रपती मेश्राम (४०, रा. आंबेडकरनगर) यांनी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी ट्रक क्रमांक एमएच २७ बीएक्स ७३७३ व ट्रक क्रमांक एमएच ४० बीएल ५४२४ च्या चालकांविरुद्ध भादंविच्या कलम ३०४ (अ), २७९ अन्वये गुन्हा नोंदविला. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष तोकलवाड यांच्याकडून करण्यात आला.

Web Title: The body of the driver trapped in the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.