विदर्भातील आठ संस्थांना भूदान जमिनीची खिरापत, २०१४-१८ दरम्यान भूदान मंडळद्वारा निकटवर्तीयांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 05:27 PM2018-07-24T17:27:36+5:302018-07-24T17:28:04+5:30

भूदान चळवळीत आचार्य विनोबा भावे यांना मिळालेल्या भूदानापैकी २०.८ हेक्टर जमीन भूदान यज्ञ मंडळाने नियमांना बगल देत चक्क विदर्भातील आठ शैक्षणिक संस्थांना बहाल केली.

Bhudan land scandal : Benefits to eight institutions in Vidarbha | विदर्भातील आठ संस्थांना भूदान जमिनीची खिरापत, २०१४-१८ दरम्यान भूदान मंडळद्वारा निकटवर्तीयांना लाभ

विदर्भातील आठ संस्थांना भूदान जमिनीची खिरापत, २०१४-१८ दरम्यान भूदान मंडळद्वारा निकटवर्तीयांना लाभ

- गजानन मोहोड
अमरावती : भूदान चळवळीत आचार्य विनोबा भावे यांना मिळालेल्या भूदानापैकी २०.८ हेक्टर जमीन भूदान यज्ञ मंडळाने नियमांना बगल देत चक्क विदर्भातील आठ शैक्षणिक संस्थांना बहाल केली. विशेष म्हणजे, या सर्व संस्था अशासकीय व तत्कालीन अध्यक्षांच्या निकटवर्तीयांच्या असल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील तक्रारींना पूर्णत: बेदखल करण्यात आले. महसूलच्या अधिकारी कर्मचाºयांनीदेखील नियमबाह्य फेरफार बिनबोभाट केले.
भूदान यज्ञ अधिनियम १९५३ चे कलम ३ अन्वये शेती कसणाºया भूमिहीन शेतमजुरास जमीन देण्याची तरतूद असताना, कलम ३३ (अ) चा अन्वयार्थ लावीत सेवाभावी म्हणून ओळखल्या जाणाºया भूदान यज्ञ मंडळद्वारा नियमांना बगल देण्यात आली. यामध्ये २० मे १९७७ रोजी वर्धा येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाला वर्धा तालुक्यातील जऊळगाव येथील १.६२ हेक्टरचा पट्टा देण्यात आला. याव्यतिरिक्त उर्वरित सातही पट्टे अशासकीय संस्थांना अलीकडच्या चार वर्षांत देण्यात आले. विशेष म्हणजे, यासाठी झालेला विरोध हा दडपशाहीने मोडीत काढण्यात प्रकार या सर्वोदयी अन् सेवाभावी संस्थेत झाला.

हा तर शहरालगतच्या जमिनी बळकविण्याचा प्रकार
- वर्धा जिल्ह्यात मौजा वाठोडा (ता. वर्धा) येथील पट्टा क्र. १८५ मधील १.६२ हेक्टर जमीन १६ मार्च २०१७ ला तक्षशिला बहुउद्देशीय शिक्षण संस्थेला देण्यात आली.
- यवतमाळ जिल्ह्यात मौजा वागापूर लसीना (ता. यवतमाळ) येथील  पट्टा क्र. २९८ मधील ३.२२ हेक्टर जमीन २९ नोव्हेंबर २०१७ ला बडनेरा येथील महासिद्धीदाय दत्त चॅरीटेबल ट्रस्टला देण्यात आली.
-  यवतमाळ जिल्ह्यातील मौजा आलेगाव (ता. बाभूळगाव) येथील पट्टा क्र. ३३५ मधील ४.३ हेक्टर जमीन ६ जानेवारी २०१८ ला श्री संत तुकडोजी महाराज प्रचार प्रशिक्षण संस्थेला देण्यात आली.
- अमरावती जिल्ह्यात मौजा कापूसतळणी (ता. अमरावती) येथील  पट्टा क्र. ५० मधील १.३१ हेक्टर जमीन १० सप्टेंबर २०१५ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रचारक मंडळाला देण्यात आली.
-अमरावती जिल्ह्यात मौजा नांदुरा पिंगळाई (ता. अमरावती) येथील  पट्टा क्र. २५६ मधील ७.३६ हेक्टर जमीन यवतमाळ जिल्ह्यातील चिचगाव येथील सेवासमर्थ बहुउद्देशीय संस्थेला देण्यात आली.
-  नागपूर जिल्ह्यात मौजा गादा (ता. कामठी) येथील पट्टा क्र. २५ मध्ये १.३८ हे. आर जमीन ७ मार्च २०१७ ला  सर्वमयी प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेला देण्यात आली.
- यवतमाळ जिल्ह्यात मौजा शिवाजीनगर (ता. उमरखेड) येथील पट्टा क्र. १६६ मधील १.२१ हेक्टर जमीन ६ डिसेंबर २०१६ ला कल्याणी एज्युकेशन अँड वेलफेअर संस्थेला देण्यात आली.

कम्युनिटी पर्पझचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. याला विरोध केला असता, अध्यक्षांनी त्यांच्या बाजूने बहुमताने ठराव घेऊन चुकीच्या पद्धतीने पट्टा देण्यास भाग पाडले. सचिवाला येथे सीमित अधिकार आहेत.
- एकनाथ डगवार, सचिव, भूदान यज्ञ मंडळ, यवतमाळ

Web Title: Bhudan land scandal : Benefits to eight institutions in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.