रेस्क्यु'द्वारे अस्वलीला पकडले
By Admin | Updated: March 27, 2017 00:09 IST2017-03-27T00:09:40+5:302017-03-27T00:09:40+5:30
अकोट तालुक्यातील अक्कलखेड शेतशिवारात शिरलेल्या अस्वलीला रेस्क्यु आॅपरेशनद्वारे पकडले.

रेस्क्यु'द्वारे अस्वलीला पकडले
'अक्कलखेडची घटना : अमरावती वनविभागाची कामगिरी
अमरावती : अकोट तालुक्यातील अक्कलखेड शेतशिवारात शिरलेल्या अस्वलीला रेस्क्यु आॅपरेशनद्वारे पकडले. अमरावती वनविभागाच्या रेस्क्यु पथकाने तब्बल चार तास परिश्रम घेऊन अस्वलीला पकडून अकोट वनविभागाच्या स्वाधीन केले.
अकोट वनपरिक्षेत्रातील पोपटखेड रोडवर स्थित असणाऱ्या अक्कलखेड येथील झाडे यांच्या शेतशिवारात अस्वल मुक्तसंचार करीत असल्याचे आढळून आले होते. याबाबत अकोट वनविभागाला माहिती मिळताच त्यांनी तत्काळ झाडे यांच्या शेतशिवाराकडे धाव घेतली. वनअधिकारी लोणकर यांनी तेथील स्थिती बघितली असता मानव व वन्यप्राणी संघर्ष होण्याची स्थिती नाकारता येत नव्हती. अकोट वनविभागाकडे रेस्कु पथक नसल्यामुळे त्यांनी तत्काळ अस्वलीबाबत अमरावती वनविभागातील उपवनसंरक्षक हेमंत मिना यांना माहिती दिली. त्यानुसार मिना यांच्या निर्देशानुसार रेस्कु पथकातील एस.के.वाजगे, अमोल गावनेर, फिरोज खान, सतीन उमक,मनोज ठाकुर, चंद्रकांत मानकर, किशोर खडसे यांनी रविवारी सकाळी अकोट गाठले. अकोट वनाधिकारी व अमरावतीचे रेस्कु पथक अक्कलखेड शेतशिवारात पोहोचले. तेथील सर्व परिस्थिती जाणून घेतल्यानंतर अमरावतीच्या पथकाने अस्वलीसाठी रेस्कु चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अस्वलीला बेशुध्द करण्यासाठी अकोट येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत औषधीची मात्र निश्चीत करण्यात आली. त्यानुसार अमोल गावनेर यांनी ट्रग्युलाईज गॅनद्वारे डॉट मारण्यासाठी अस्वलीवर निशाणा साधला. तीन ते चार तास वनकर्मचाऱ्यांनी अस्वलीचा मागोवा घेतला. त्यानंतर गावनेर यांनी अस्वलीला डाट मारून बेशुध्द केले. अस्वल बेशुध्द झाल्यानंतर तिला पिंजऱ्यात टाकून अकोट वनविभागाच्या स्वाधिन करण्यात आले. (प्रतिनिधी)