दहिहंडीत भुरट्यांचा सुळसुळाट, १५ मोबाइल लांबविले

By प्रदीप भाकरे | Updated: September 11, 2023 16:55 IST2023-09-11T16:53:10+5:302023-09-11T16:55:24+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही नवाथे चौक येथे रविवारी ती दहीहंडी स्पर्धा रंगली

Amravati Dahi Handi competition was held; thieves stole near 15 mobile phones | दहिहंडीत भुरट्यांचा सुळसुळाट, १५ मोबाइल लांबविले

दहिहंडीत भुरट्यांचा सुळसुळाट, १५ मोबाइल लांबविले

अमरावती : आमदार रवी राणा प्रणित युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने १० सप्टेंबर रोजी नवाथे चौकात घेण्यात आलेल्या दहीहंडी स्पर्धेला उसळलेल्या गर्दीचा चोरांना गैरफायदा घेतला. चोरांनी या दहीहंडीतून तब्बल १५ मोबाइल लांबविले. या संदर्भात संबंधितांनी राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविल्या आहेत. एक दुचाकी देखील ठेवलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. मात्र त्याबाबत अद्यापपर्यंत तक्रार दाखल झालेली नाही.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नवाथे चौक येथे रविवारी ती दहीहंडी स्पर्धा रंगली. दुपारी एक वाजतापासून सुरू झालेली ही स्पर्धा रात्रीपर्यंत चालली. विशेष म्हणजे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, गदर २ फेम अमिषा पटेल व अभिनेता राजपाल यादव यांनी हजेरी लावल्याने या दहीहंडी स्पर्धेला एकच गर्दी उसळली होती. त्यात तरूणाईचा टक्का अधिक होता. या गर्दीत चोरटेही सक्रिय झाले होते. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत चोरांनी तब्बल १५ महागडे मोबाइल लांबविले. स्पर्धा संपल्यावर मोबाइल चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी राजापेठ ठाणे गाठून तक्रार दाखल करणे सुरू केले. पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद घेतली असून चोरांचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Amravati Dahi Handi competition was held; thieves stole near 15 mobile phones