लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशातील पहिले 'डिजिटल व्हिलेज' म्हणून मेळघाटातील हरिसाल या गावाची २०१५ साली मोठ्या थाटात घोषणा झाली. अवघ्या एका वर्षातच ते अस्तित्वातदेखील आले. मात्र लवकरच ते अपयशी ठरले. इंटरनेट सेवेच्या कोलदांड्यामुळे 'डिजिटल व्हिलेज'चे नुसते स्वप्नच भंगले नाही तर शासनाची ही योजना फसवी ठरल्याचा प्रत्यय मेळघाटवासीयांना आला. आज दहा वर्षानंतर 'डिजिटल व्हिलेज हरिसाल' असा फलकच तेथे दिसतो. योजना मात्र बासनात गुंडाळल्या गेल्या. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष दिले असते तर हरिसाल हे खरंच आदर्श गाव ठरले असते. मेळघाटातून कुपोषणाला हद्दपार करून तेथील आदिवासी नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्यातून हरिसाल हे 'डिजिटल व्हिलेज' म्हणून नावारूपास आले. राज्य शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात झालेल्या करारानुसार धारणी तालुक्यातील हरिसाल गावाला इंटरनेट सेवेच्या माध्यमातून जगाशी जोडण्यात आले.
जगाच्या नकाशावर हरिसालची ओळख झाली. परंतु स्थानिक जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हे गाव आज 'एक्स डिजिटल व्हिलेज' झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने संपूर्ण शासकीय यंत्रणा कामी लागली होती. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अनेक वाऱ्या झाल्या. गावात मोफत वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी भूमिगत फायबर ऑप्टिक केबल्स टाकण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. मात्र अवघ्या काही वर्षातच ही सेवा बंद झाली. ७५० एटीएम कार्डचे वाटप करण्यात आले होते. प्रत्यक्षात किती सुरू आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे.
काही वर्षांतच बंद झाले ई- टेलिमेडिसिन केंद्र
- गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात ई- टेलिमेडिसिन केंद्र आले. २०१६ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत या केंद्रात सुमारे ३५० रुग्णांनी लाभघेतल्याची नोंद आहे.
- गावात बसून रुग्णांना अमरावती 3 शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभेल, अशी योजना आखण्यात आली होती. काही दिवस त्याची अंमलबजावणीदेखील झाली. परंतु फेब्रुवारी २०१९ पासून हे केंद्र डॉक्टरांअभावी बंद झाले.
"सरकारी गावकऱ्यांना योजना आणि सेवांचा लाभ घेता यावा, यासाठी डिजिटल कार्यालय स्थापन करण्यात आले होते. मात्र आता तेही बंद झाले आहे. एकंदरीत डिजिटल सुविधा कुठेही दिसत नाही."- सलीम भटारा, माजी उपसरपंच, हरिसाल.