‘त्या’ तक्रारीची एडीजींकडून चौकशी; गृहमंत्रालयाकडे सोपविला जाणार अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 12:50 IST2022-04-18T12:46:15+5:302022-04-18T12:50:14+5:30
रजिंदरसिंग व अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असलेली चौकशी समिती शनिवारपासून शहरात आल्याची माहिती आहे.

‘त्या’ तक्रारीची एडीजींकडून चौकशी; गृहमंत्रालयाकडे सोपविला जाणार अहवाल
अमरावती : आपण दिल्लीत असताना आपल्याविरुद्ध अमरावतीत खोटे गुन्हे नोंदविण्यात आले. राजापेठ पोलिसांनी ते गुन्हे राजकीय दबावापोटी दाखल केल्याची आरोपवजा तक्रार आमदार रवी राणा यांनी विधिमंडळात केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने रविवारी अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजिंदरसिंग यांनी अमरावती शहर पोलीस आयुक्तालय गाठले तथा आमदार रवी राणा यांचा जबाब नोंदवून घेतला. रविवारी दुपारी राणांव्यतिरिक्त अन्य काही जणांचे बयाणदेखील नोंदविण्यात आले.
पोलिसांनी आपल्यासह आपल्या सहकाऱ्यांविरुद्ध खोटे गुन्हे नोंदवल्याचा आरोप करून आमदार राणा यांनी तो मुद्दा विधानसभेत उचलला होता. त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची अप्पर पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वातील सहा सदस्य समितीकडून चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते. त्याअनुषंगाने राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजिंदरसिंग यांनी शहर आयुक्तालय गाठले. आमदार राणा यांनी समितीसमोर ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणाची वस्तुस्थिती समितीसमोर विषद केली. यावेळी खासदार नवनीत राणा यादेखील उपस्थित होत्या.
एडीजी दोन दिवसांपासून अमरावतीत
रजिंदरसिंग व अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असलेली चौकशी समिती शनिवारपासून शहरात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी आमदार राणा यांच्या तक्रारीत नमूद असलेल्या संबंधितांचेदेखील बयाण नोंदविले गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलीस विभागाकडून त्याला दुजोरा मिळाला नाही. याप्रकरणी राजापेठ पोलिसांत ९ फेब्रुवारी रोजी शाईफेक व जीवघेणा हल्ला केल्याची तक्रार नोंदविणाऱ्या महापालिका आयुक्तांचादेखील जबाब नोंदविला जाणार असल्याची माहिती आहे.
पोलिसांना हाताशी धरून आपल्यासह ११ जणांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा मुद्दा विधिमंडळात मांडला होता. त्याअनुषंगाने रविवारी चौकशी समितीप्रमुख असलेल्या एडीजींसमोर परिस्थिती विशद केली. विधानभवनातून आलेले प्रोसेडिंगदेखील त्यांनी आपणास दाखविले.
- रवी राणा, आमदार, बडनेरा