कुख्यात गुंड शेख शहबाजवर 'एमपीडीए अंतर्गत कारवाई; पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 12:58 IST2026-02-24T12:47:08+5:302026-02-24T12:58:11+5:30
Amravati : शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमरावती शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कडक मोहीम उघडली आहे.

Action taken against notorious gangster Sheikh Shahbaz under MPDA; Police Commissioner slams criminals
अमरावती: शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमरावती शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कडक मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुन्हेगार शेख शहबाज उर्फ मुरारी शेख कलीम (वय २५, रा. झिब्राईल बाबा दर्गा जवळ, पठाण चौक) याच्यावर 'एमपीडीए'कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी २३ फेब्रुवारी रोजी या कारवाईचे आदेश निर्गमित केले.
शेख शहबाज हा सन २०१८ पासून अमरावती शहरात सक्रिय आहे. त्याच्यावर नागपुरी गेट, खोलापुरी गेट आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत खून, जबर दुखापत, घरफोडी, अश्लील कृत्य करणे, अवैध अग्निशस्त्रे व घातक शस्त्रे बाळगणे, आणि तडीपार आदेशांचे उल्लंघन करणे असे एकूण ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी कारवाया थांबत नसल्याने ही कठोर पाऊले उचलण्यात आली आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर शेख शहबाजला ताब्यात घेऊन २३ फेब्रुवारी रोजी अमरावती मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.