त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:44 IST2025-10-03T11:42:36+5:302025-10-03T11:44:26+5:30
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या 11 पैकी सात जणांची परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये कसून चौकशी केली जात आहे. तर उर्वरित चौघांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात चौकशीसाठी नेण्यात आले आहे.

त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
अमरावती : हरियाणा राज्यातील आंतरराष्ट्रीय कुख्यात गॅंगचे सक्रिय सदस्य असलेल्या 11 जणांना अमरावती ग्रामीण पोलीस व नागपूर गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने परतवाडा येथून ताब्यात घेतले. 2 ऑक्टोबर रोजी रात्री 10 ते 11 च्या सुमारास ती चकमक उडाली. यात ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडून हवेत एक राउंड फायर देखील करण्यात आला.
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या 11 पैकी सात जणांची परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये कसून चौकशी केली जात आहे. तर उर्वरित चौघांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात चौकशीसाठी नेण्यात आले आहे. कॅनडामध्ये बसून भारतात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या एका कुख्यात गॅंगशी ते संबंधित असल्याचे समोर आले आहे. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद व स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख किरण वानखडे हे 2 ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास परतवाडा येथे पोहोचले.
हरियाणा येथील ते टोळीचे सदस्य परतवाडा येथील ब्राह्मण सभा भागातील एका घरात दडले असल्याची माहिती अमरावती ग्रामीण पोलिसांना मुंबई गुन्हे शाखेने दिली होती. सोबतच हरियाणा पोलिसांच्या माहितीनुसार नागपूरचे गुन्हे शाखेचे पथक देखील अमरावती ग्रामीण पोलिसांना येऊन मिळाले. माहितीनुसार एसपी विशाल आनंद व एलसीबी प्रमुख किरण वानखडे हे दुपारी दीड वाजता पासूनच परतवाडा येथील एका घराजवळ थांबले होते. दसऱ्याची गडबड कमी झाल्यानंतर गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना पकडण्यासाठी आघाडी घेतली. त्यात अमरावती ग्रामीण पोलिसांकडून हवेत एक फायर देखील करण्यात आला. कारवाईदरम्यान दोन ठिकाणाहून एकूण 11 जणांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान शुक्रवारी सकाळी मुंबई सह अकोला येथील एटीएसचे पोलीस पथक देखील परतवाड्यात पोहोचले आहे. अमरावती ग्रामीण पोलीस व नागपूर गुन्हे शाखेचे पथक मुंबई व अकोला येथील पोलीस पथकाला सहकार्य करत असून दुपारी बारा वाजेपर्यंत या प्रकरणातील संपूर्ण तथ्य उघड होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
11 जणांपैकी एक जण हरियाणा व कॅनडा इथून चालविल्या जाणाऱ्या त्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सक्रिय सदस्य असल्याचे देखील समोर आले आहे. मात्र ती 10 11 जणांची टोळी नेमकी परतवाडा येथे येऊन नेमकी कुठल्या गुन्हेगारी कारवाई करणार होती ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. ब्राह्मण सभा भागातील ज्या घरातून या 11 संशयतांना ताब्यात घेण्यात आले, त्या घरात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सहा महिन्यात दहा ते बारा लोक येऊन आयुर्वेदिक औषधी वा अन्य तत्सम वस्तू विकण्याचा व्यवसाय करीत असतात. तरी यातील मुख्य सूत्रधार हा गुरुवारीच परतवाड्यात दाखल झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अनुसार हरियाणा पोलिसांनी नागपूर क्राईम ब्रँचला तर मुंबई क्राईम ब्रँचनी अमरावती ग्रामीण पोलिसांना त्यांना ताब्यात घेण्याची सूचना दिली होती. त्या 11 संश्वेतांकडून अग्नि शस्त्र व अन्य शस्त्रास्त्रे जप्त केल्याची माहिती हाती आली आहे.