धक्कादायक! कॉलेजमध्ये शिरून तरूणीची छेड, रोडरोमियोविरुद्ध गुन्हा दाखल
By प्रदीप भाकरे | Updated: May 22, 2023 16:53 IST2023-05-22T16:52:28+5:302023-05-22T16:53:43+5:30
अपहरणाचा प्रयत्न फसला

धक्कादायक! कॉलेजमध्ये शिरून तरूणीची छेड, रोडरोमियोविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावती : कॉलेजच्या इमारतीत शिरून एका विद्यार्थीनीची छेड काढण्यात आली. अन्य विद्यार्थी व शिक्षकांनी मध्यस्थी करून त्या रोडरोमियोला पळवून लावले. २० मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कॉलेजच्या आत हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी २१ मे रोजी पहाटे दोनच्या सुमारास आरोपी अंकित गोसावी (रा. अमरावती) याच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, येथील एका कॉलेजवयीन तरूणीची सहा महिन्यांपूर्वी शहरातील ट्रॅकवर ओळख झाली. ती तीन चारदा त्याच्याशी बोलली देखील. दरम्यान त्याने तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यावर तो नेहमीच कॉल करून तिला त्रास देऊ लागला. त्यामुळे तिने त्याच्या त्रासाबद्दल कुटुंबियांना सांगितले. त्यामुळे त्यांनी अंकित गोसावीचे घर गाठून त्याच्यासह त्याच्या आईवडिलांना देखील समजावून सांगितले. मात्र त्याचा त्याच्यावर कुठलाही फरक पडला नाही. त्यानंतर पाठलाग करून तो तिला त्रास देत राहिला.
अशी घडली घटना
२० मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास सदर तरूणी ही तिच्या कॉलेजमध्ये असताना अंकित गोसावी तेथे आला. त्याने अनोळखी क्रमांकावरून तिला कॉल केला. तो रिसिव्ह न केल्याने तो थेट पहिल्या मजल्यावर असलेल्या तरूणीजवळ पोहोचला. तिच्याजवळ जाऊन तू दोन मिनिटे कॉलेजबाहेर चल, असे तो म्हणाला. तिने नकार दिला असता, त्याने तिचा हात पकडत ओढत नेत असताना विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी कॉलेजमधील शिक्षकांना तेथे बोलावून घेतले. त्यामुळे अंकित तेथून पळून गेला. कॉलेज संपून घरी परतल्यानंतर तिने कुटुंबियांना आपबिती सांगितली. त्यानंतर बडनेरा ठाणे गाठले.