2.34 crore scam FIR when? | २.३४ कोटींचा घोटाळा एफआयआर केव्हा?

२.३४ कोटींचा घोटाळा एफआयआर केव्हा?

ठळक मुद्देवैयक्तीक शौचालय : बनावट नस्ती प्रकरणातील ‘मास्टरमार्इंड’ पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा झोनमध्ये झालेल्या वैयक्तिक शौचालय बांधकामाच्या ७५ लाखांच्या बनावट नस्ती प्रकरणात अटकेतील दोघांचा साथीदार योगेश कावरे (रा. बडनेरा) हाच ‘मास्टरमार्इंड’ असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तशी माहिती आरोपींनी दिल्यानंतर पोलिसांनी योगेशवर गुन्हे दाखल केले आहेत. तो पसार आहे. त्रिसदस्यीय समितीच्या चौकशीत याच झोनमध्ये २.३४ कोटींच्या देयकाचा घोटाळा उघड झाला आहे. यात खोट्या लाभार्थींच्या नावे काही बिले काढली गेली असतानाही अद्याप एफआयआर का नाही, असा नागरिकांचा सवाल आहे.
बडनेरा झोनमध्ये ४०० हून अधिक लाभार्थींच्या नावाने ७५ लाखांच्या तीन बनावट नस्तीचा प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर उपायुक्तांनी केलेल्या चौकशीतील लेखी जबाबात अधिकाऱ्यांनी आपली स्वाक्षरी नसल्याचे स्पष्ट करीत हात वर केले होते. या प्रकरणात लेखा विभागातील लिपिक अनुप सारवान व बडनेरा झोनचा कंत्राटी संदीप राईकवार यांच्याविरुद्ध तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यांच्या तपासात दोन्ही आरोपींकडून बडनेरात एका एनजीओचा संचालक असलेल्या योगेश कावरेचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
योगेशचे नाव या प्रकरणात जोडले गेल्यापासून तो पसार आहे. पोलिसांनी त्याचे घर, कार्यालयाची झडती घेतली व कागदपत्रांची तपासणी केली. यामध्ये काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे त्यांच्या हाती लागल्याचे सांगण्यात आले. समाजात उजळमाथ्याने वावरत असलेल्या या मास्टरमाइंडची शहरातील अनेक पदाधिकारी व महापालिकेतील काही अधिकाऱ्यांशी जवळीक आहे. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे उघड होणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आता चांगलीच रंगली आहे.

‘आरके’च्या अ‍ॅग्रीमेंटमधील देयकाचा लाभार्थी
बडनेरा झोनमधील वैयक्तिक शौचालयाच्या २.३४ कोटींच्या कामाचा करारनामा आरके कन्स्ट्रक्शनशी झालेला असताना, देयके मात्र आरके ऐवजी अन्य कंत्राटदार व संस्थांना देण्यात आली. समितीच्या चौकशीत हा प्रकार उघड झाला. या प्रकरणाची व्याप्ती फार मोठी असल्याने याही प्रकरणात महापालिका प्रशासनाद्वारा एक-दोन दिवसांत पोलिसात तक्रार देण्यात येणार आहे. यामधील बोगस देयकाचा हा मास्टरमार्इंड लाभार्थी असल्याची बाब आता महापालिका वर्तुळात उघडपणे बोलले जात आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष का?
प्रकरणातील नस्ती तयार केल्यानंतर त्यातील जावक क्रमांक, बिलांचे विवरण, लाभार्थींची नावे, पोर्टलवरील नोंद, झालेल्या कामाची खातरजमा तत्कालीन उपायुक्तांसह, सहायक आयुक्त, एमओएच, विभाग प्रमुख, उपअभियंता, अभियंता, एसआय, सिनिअर एसआय यापैकी एकानेही करू नये, हेच मोठे कोडे आहे. यातच खरे रहस्य दडले आहे. कामाचे कमिशन हा तर महापालिकेतील शिरस्ताच आहे. मात्र, बनावट नस्तीच समोर आलेली असताना, त्यावर काहींनी सह्या करणे व काहींनी बनावट स्वाक्षरी असल्याचे सांगणे प्रकरणाचा गुंता वाढवित आहे.

महापालिकेतील अधिकाऱ्यांची बेपर्वाई, दिरंगाई व निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडला असल्याचे मी मानतो. अन्य प्रकरणांतही आता पोलिसांत तक्रार दिली जाईल व जबाबदार अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात येईल. कोरोनात यंत्रणा व्यस्त असल्याने विलंब होत आहे. दोषी असल्यास कुणाचाही मुलाहिजा नाही. - प्रशांत रोडे आयुक्त, महापालिका

Web Title: 2.34 crore scam FIR when?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.