अमरावती विभागात पहिल्याच दिवशी कॉपी करतांना २२ विद्यार्थी पकडले; करण्यात आले रस्टिकेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:42 IST2026-02-12T14:41:52+5:302026-02-12T14:42:49+5:30
Amravati : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा सोमवार, १० फेब्रुवारीपासून सुरू झाली.

22 students caught copying on the first day in Amravati division; rusticated
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा सोमवार, १० फेब्रुवारीपासून सुरू झाली. अमरावती विभागात परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गैरप्रकारांवर कडक कारवाई करत एकूण २२ विद्यार्थ्यांना रस्टिकेट करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
अमरावती विभागात परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. संवेदनशील केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अनेक केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख केली जात आहे. कॉपीमुक्त वातावरण राखण्यासाठी उड्डाण पथके, व्हिजिलन्स पथके तसेच केंद्राध्यक्षांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. सोमवारी इंग्रजीच्या पेपरपासून परीक्षेची सुरुवात झाली. पहिल्या दिवशी बहुतांश केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडली. विद्यार्थ्यांनी वेळेत केंद्रावर हजेरी लावत नियमांचे पालन केले.
पेपरदरम्यान विविध परीक्षा केंद्रांवर भरारी पथकांनी अचानक भेटी देत तपासणी केली. काही विद्यार्थी कॉपी करताना किंवा आक्षेपार्ह साहित्य बाळगताना आढळून आले. संबंधित विद्यार्थ्यांकडून चिठ्ठया, तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. मंडळाच्या नियमानुसार तत्काळ कारवाई करत या विद्यार्थ्यांना चालू परीक्षेतून रस्टिकेट करण्यात आले. यात अकोला व बुलाण जिल्ह्यातील प्रत्येकी एक-एक तर वाशिम जिल्ह्यातील २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा अवलंब केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी लागल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार सहन केला जाणार नाही, असा इशाराही शिक्षण मंडळाने दिला आहे.
या केंद्रावर विद्यार्थ्यांना केले रस्टिकेट
अकोला जिल्ह्यातील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गांधीग्राम येथे एक विद्यार्थी, बुलढाणा जिल्ह्यातील जिजामाता ज्युनिअर कॉलेज हिवरा खुर्द येथे एक विद्यार्थी, वाशिम जिल्ह्यातील वसंतराव नाईक कला कनिष्ठ महाविद्यालय किन्ही राजा येथे एक विद्यार्थी, वाशिम जिल्ह्यातील अप्पास्वामी ज्युनिअर कॉलेज शेंदूर्जना (अढाऊ) येथे दोन विद्यार्थी तर वाशिम जिल्ह्यातील वाघामायदेवी आदिवासी क.म.वि. रुईगोस्ता येथील केंद्रावर तब्बल १७ असे एकूण २२ विद्यार्थी रस्टिकेट केले आहे.
"बारावीच्या परीक्षेदरम्यान सोमवारी अमरावती विभागातील तब्बल २२ विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान गैरमार्गाचा अवलंब केल्याने त्यांना रस्टिकेट करण्यात आले आहे."
- संदीप संगावे, अध्यक्ष, अमरावती विभागीय शिक्षण मंडळ