१८ घरकुले, २ सिंचन विहिरी अन् ६४ शौचालये बोगस; कारवाई होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 18:12 IST2025-08-16T18:12:12+5:302025-08-16T18:12:44+5:30
Amravati : तळेगाव दशासर ग्रा.पं.चा प्रताप; सीईओंद्वारा गठित चौकशी समितीचा अहवाल

18 houses, 2 irrigation wells and 64 toilets are bogus; will action be taken?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धामणगाव रेल्वे दशासर तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायतीत सन २०२० ते २०२४ या दरम्यान १८ घरकुले, २ सिंचन विहिरी आणि ६४ शौचालये बोगस आढळून आली आहेत. मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या निर्देशानुसार गठित चौकशी समितीचा हा अहवाल असून २० लाखांपेक्षा जास्त शासन निधीचा अपहार झाला आहे. असे असताना जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत यातील दोषींवर कोणतीही कारवाई न केल्यामुळे संशय बळावला आहे.
तळेगाव दशासर येथे २९ मे २०२५ रोजी विशेष ग्रामसभा बोलावून स्वच्छ भारत मिशन व सिंचन विहीर यासह १४ व १५ वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या विकासकामात घोटाळ्याबाबत चौकशी अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. तसा ठराव ग्रामसभेने पारितदेखील केला होता. परंतु, ग्रामपंचायतीने याविषयी कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी या विषयाला वाचा फोडण्यासाठी १० जून २०२५ रोजी तळेगाव दशासर ग्रामपंचायतीसमोर अशोकराव धनजोळे, संजय सारवे, रमेशराव ठवकर, अमर सुरजुसे, अतिश कावळे, पुंडलिकराव बाबरे, शंकरराव शेलोकार, शंकरराव शिरभते बेमुदत उपोषण केले होते.
सलग चार दिवसांच्या उपोषणनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संजीता महापात्र यांचे पत्र आणि आमदार प्रताप अडसड यांच्या आश्वासानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरूड येथील चार अधिकाऱ्यांची १२ जून २०२५ रोजी समिती गठित करण्यात आली होती.
सीइओंना २५ जुलै रोजी चौकशी अहवाल सादर
लेखी जबाब, रेकॉर्डची पडताळणी करून चौकशी समितीने सीईओंना २५ जुलै २०२५ रोजी प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला. या समितीने ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष भेट दिली होती.
एकाच कुटुंबात पती-पत्नीसह तिघांना घरकुल
चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार सिंचन विहिरीचा लाभसधन व्यक्तीला देण्यात आला आहे. तर पती-पत्नीसह त्याच कुटुंबात तिघांना घरकुलाचा लाभ घेतला आहे. त्यामुळे शासन निधीचा गैरवापर करण्यात तळेगाव दशासर ग्राम पंचायतने कळस गाठल्याचा उल्लेख आहे. मनरेगा अंतर्गत विहिरींचा लाभ श्रीमंताना देण्यात आला आहे. या चौकशी समितीने १७ जून ते १७ जुलै २०२५ या दरम्यान ग्रामपंचायत दशासर येथे प्रत्यक्ष भेट देत तक्रारकर्त्यांचे बयाण नोंदविले होते.
"तळेगाव दशासर येथे ग्रामपंचायतीने शासन निधीत अपहार केल्याप्रकरणी चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून यात पडताळणी अंती जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल."
- संजीता महापात्र, सीईओ, अमरावती.