११० आदिवासींविरुद्ध चिखलदरा पोलिसात गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 19:03 IST2019-01-24T19:03:02+5:302019-01-24T19:03:29+5:30
केलपाणी जंगलात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस, सीआरपीएफ, वनाधिकारी-कर्मचारी यांच्यावर हल्ला करणा-या ११० आदिवासींविरुद्ध सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनेश तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत.

११० आदिवासींविरुद्ध चिखलदरा पोलिसात गुन्हे दाखल
चिखलदरा (अमरावती) - केलपाणी जंगलात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस, सीआरपीएफ, वनाधिकारी-कर्मचारी यांच्यावर हल्ला करणा-या ११० आदिवासींविरुद्ध सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनेश तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत.
पुनर्वसित आठ गावांतील आदिवासी गाव सोडून गाभा क्षेत्रातील मूळ गावी केलपानी येथे १५ जानेवारीपासून ठाण मांडून होते. त्यांना समजावण्यासाठी गेलेल्या वनाधिकारी-कर्मचारी, पोलीस, सीआरपीएफच्या जवानांवर त्यांनी काठ्या, कुºहाडी, कुकरी, मिरची पूड, काचकुहिरी टाकून अचानक हल्ला केला. यात वनविभागाचे ५० अधिकारी, कर्मचारी, सीआरपीएफ व पोलीस कर्मचारी गंभीर व किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनेश तायडे यांच्या फिर्यादीवरून ११० आदिवासींविरुद्ध हत्येचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा, मारहाण, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, बीपी अॅक्ट अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर आठही गावांमध्ये असलेल्या पुनर्वसित आदिवासींमध्ये दहशत पसरली आहे. काही दिवस अटकेची कारवाई स्थगित असली तरी अधिकारी-कर्मचा-यांवर मोठ्या प्रमाणात झालेला हल्ला पाहता, त्यांना अटक केले जाणार आहे.
गोळीबार नव्हे, अश्रुधुराच्या नळकांड्या
आदिवासींनी अचानक शासकीय अधिकारी कर्मचा-यांवर हमला करताच त्यांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या असल्याचे चिखलदराचे ठाणेदार आकाश शिंदे यांनी गुरुवारी पुन्हा स्पष्ट केले.
जखम पायाला कशी?
अश्रुधुराच्या गनमधून हवेची दिशा पाहून वर फायर केले जाते. त्याचा आवाज होतो व सर्वत्र धूर पसरतो. असे असताना चंपालाल पेठेकर च्या पायाला अश्रुधुराचे नळकांडे कसे लागले, हे अजूनही अनुत्तरित आहे.