युवक काँग्रेसची ‘हायटेक’ निवडणूक; अॅपद्वारे पार पडणार मतदान प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:16 IST2018-09-05T14:12:29+5:302018-09-05T14:16:02+5:30
राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच युवक काँग्रेसने कामाला जोरदार सुरुवात केली आहे.

युवक काँग्रेसची ‘हायटेक’ निवडणूक; अॅपद्वारे पार पडणार मतदान प्रक्रिया
- सचिन राऊत
अकोला : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच युवक काँग्रेसने कामाला जोरदार सुरुवात केली आहे. राज्यभरातील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी एका ‘हायटेक’ निवडणूक प्रक्रियेचा उपयोग करून युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष पदासाठी राज्यभरात ९, १० व ११ सप्टेंबर रोजी टॅबमधील एका अॅपद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
राज्यात जिल्हा-परिषद, पंचायत समिती व त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी युवक काँग्रेसने पूर्वतयारी सुरू केली असून, गत सहा महिन्यांपासूनच युवक काँग्रेसची सदस्य नोंदणी केली आहे. राज्यभर युवक काँग्रेस सदस्यांची नोंदणी केल्यानंतर आता विविध पदांसाठी हे सदस्य ९, १० व ११ सप्टेंबर रोजी मतदान करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष पदासाठी आ. अमित झनक, सत्यजित तांबे व कुणाल राऊत रिंगणात आहेत, तर प्रदेश महासचिव पदासाठी सागर देवेंद्र कावरे, अभिषेक भरगड, सागर देशमुख व श्रेयश इंगोले उभे आहेत. यासोबतच जिल्हाध्यक्ष पदासाठी महेश गणगणे, निनाद मानकर, तर शहराध्यक्ष पदासाठी अंशुमन देशमुख, आकाश शिरसाट, सुमती गवई उभे आहेत. जिल्हा महासचिव पदासाठी अभिलाष तायडे, फारुख पटेल यांच्यासह पाच जण रिंगणात आहेत. अकोल्यातील काँग्रेसच्या दुसºया फळीतील नेते या निवडणुकीनिमित्त एकत्र आले आहेत.
-----------------------------
मतदानासाठी एक मिनीट नऊ सेकंद वेळ
युवक काँग्रेस सदस्यांना मतदान करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा स्तरावर एक टॅब ठेवण्यात येणार आहे. या टॅबमधील एका अॅपद्वारे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष या पाच उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. यासाठी सदर ‘अॅप’द्वारे पाच उमेदवारांना मतदान करण्यासाठी एक मिनीट नऊ सेकंद वेळ मिळणार आहे. या पाच उमेदवारांचे नाव व चिन्ह दिलेल्या ठिकाणावर क्लिक करून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात २२ पदाधिकाºयांची टीम
महाराष्ट्रात एकाच वेळी म्हणजेच ९, १० व ११ सप्टेंबर रोजी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी उत्तरांचल, उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा येथून काँग्रेसचे पदाधिकारी राज्यात दाखल होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात २२ तज्ज्ञ पदाधिकाºयांची टीम उपस्थित राहणार आहे. ही टीम तीन दिवस निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्हा स्तरावर तळ ठोकून राहणार आहे.