मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर चाकूने केले वार, नंतर रस्त्यावर आपटले

By आशीष गावंडे | Updated: January 7, 2025 20:07 IST2025-01-07T20:04:33+5:302025-01-07T20:07:20+5:30

ताथोड यांनी आईला धक्काबुक्की केल्याचा राग आरोपी धिरज ठाकूर याच्या मनात होता. याचा वचपा काढण्यासाठी धिरजने सविता ताथोड यांच्या दिनचर्येवर पाळत ठेवली. 

Woman stabbed while out for morning walk, then thrown on road | मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर चाकूने केले वार, नंतर रस्त्यावर आपटले

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर चाकूने केले वार, नंतर रस्त्यावर आपटले

अकोला: मॉर्निंग वॉकवरुन घरी परतणाऱ्या एका ४८ वर्षीय महिलेची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास शहरातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये येणाऱ्या जुना हिंगणा परिसरात घडली. घरी परतणाऱ्या महिलेवर चाकूने सपासप वार करुन तिचे डोके अनेकदा जमिनीवर आपटून हत्या करण्यात आली. हल्ला करणारा ३० वर्षीय युवक फरार झाला असून अत्यंत किरकोळ वादातून ही दुर्देवी घटना घडल्याचे बोलले जात आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सविता विजय ताथोड (वय ४८ रा.जुना हिंगणा, प्रभाग क्र.१८)असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर धिरज रामलालसिंग ठाकूर (वय ३० रा.जुना हिंगणा, प्रभाग क्र.१८) फरार आरोपीचे नाव आहे. 

सविता ताथोड व धिरज ठाकूर शेजारी आहेत. दोन महिन्यांपूर्वी सविता ताथोड व धिरज ठाकूर यांच्या आइमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. वादाचे पर्यावसान एकमेकींना धक्काबुक्की करण्यापर्यंत गेले होते. 

ताथोड यांनी आईला धक्काबुक्की केल्याचा राग आरोपी धिरज ठाकूर याच्या मनात होता. याचा वचपा काढण्यासाठी धिरजने सविता ताथोड यांच्या दिनचर्येवर पाळत ठेवली. 

त्या दररोज सकाळी वॉकला जातात,ही बाब हेरुन आरोपीने मंगळवारी ताथोड यांना घराजवळच्या रस्त्यात गाठले. ताथोड यांना काही समजण्याच्या आत आरोपीने त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले.

चाकूचा वार वर्मी बसताच सविता जमिनीवर कोसळल्या. आरोपीचा राग तेवढ्यावर शांत न होता त्याने सविता यांचे डोके हातात धरुन अनेकदा जमिनीवर आपटले. त्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. 

याप्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात आरोपी धिरज ठाकूर याच्याविरोधात बीएनएस कलम १०३ (१)नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महिलेने केली धावाधाव

सविता ताथोड शेजारी महिलेसोबत मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. घरापासून काही अंतरावर येताच आरोपी धिरज ठाकूरने ताथोड यांच्यावर हल्ला केला असता, सोबत असलेल्या महिलेने आरडाओरडा करुन नागरिकांना बोलविण्याचा प्रयत्न केला. 

त्यावेळी एका नागरिकाने व शेजारी महिलेने आरोपीला अडविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परंतु संतप्त आरोपी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून महिलेने सविता ताथोड यांच्या घराकडे धाव घेत कुटुंबातील व्यक्तींना घटनेची माहिती दिली. परत येइपर्यंत सविता ताथोड रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडून होत्या. 

जुने शहर पोलिसांकडून झाडाझडती

घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करुन महिलेचा मृतदेह सर्वोपचारमध्ये पाठवला. यावेळी आरोपी धिरज ठाकूरच्या घराची झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती आहे. पुढील तपास ठाणेदार लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. 

आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना

आरोपी धिरज ठाकूरच्या शोधासाठी जुने शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके व त्यांचे पथक कामाला लागल्याची माहिती आहे.

Web Title: Woman stabbed while out for morning walk, then thrown on road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.