अकोटात १७ हजार जणांचे लसीकरण; दोन दिवसांपासून लस संपली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:18 IST2021-05-15T04:18:02+5:302021-05-15T04:18:02+5:30
अकोटची लोकसंख्या लक्षात घेता लसींचा साठा वाढण्याची गरज आहे. अकोट शहरातील ग्रामीण रुग्णालय, नंदीपेठ व गोल बाजार या तीन ...

अकोटात १७ हजार जणांचे लसीकरण; दोन दिवसांपासून लस संपली!
अकोटची लोकसंख्या लक्षात घेता लसींचा साठा वाढण्याची गरज आहे.
अकोट शहरातील ग्रामीण रुग्णालय, नंदीपेठ व गोल बाजार या तीन लसीकरण केंद्रांमध्ये लस देण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लसींसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. अकोट ग्रामीण रुग्णालय शहरात दररोज ५००-५५० जणांना नोंदणी केल्यानंतर लसीचा डोस देण्यात येत आहे. आतापर्यंत १७ हजार नागरिकांना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणावर पहिला व दुसरा डोस घेण्यापासून नागरिक वंचित आहेत. लोकसंख्या तुलनेत लसीकरणाची मागणी वाढली आहे. अशातच दि. १४ व १५ मे रोजी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आली आहे. शहरात फेब्रुवारी महिन्यापासून १५ हजार लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
गजानन महाराज मंदिराच्या वतीने लसींची माहिती
शहरात दररोज कोणत्या केंद्रामध्ये लसींचा किती साठा आहे, पहिला व दुसरा लसींचा डोस कुठं मिळणार, कोणत्या केंद्रामध्ये कोणती लस उपलब्ध आहे, लसीकरण बंद राहील की सुरु, अशा बाबतीत जनजागृतीसाठी गजानन महाराज मंदिर समितीने पुढाकार घेतला असून, यासाठी पुरुषोत्तम चौखंडे सेवा देत आहेत. नागरिकांना घरपोच माहिती मिळत असल्याने दिलासा मिळत आहे.
----------------
अकोट शहरात लसींची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्हास्तरावरुन साठा उपलब्ध होताच नियोजन करुन लस देण्यात येते. लवकरच साठा उपलब्ध होणार असून, लसीकरण सुरुच राहील.
- डॉ. मंगेश दातीर, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय अकोट.