माथेफिरूकडून दोन रुग्णवाहिकांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 14:18 IST2020-01-17T14:18:00+5:302020-01-17T14:18:08+5:30
प्रत्यक्षदर्शींनी माथेफिरूला ताब्यात घेऊन सिटी कोतवाली पोलिसांकडे सोपविल्याची सूत्रांची माहिती आहे.

माथेफिरूकडून दोन रुग्णवाहिकांची तोडफोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी रात्री एका माथेफिरूने धिंगाणा घालत दोन रुग्णवाहिकांसह तीन वाहनांची तोडफोड केली. परिणामी, आवारात काही काळ दहशतीचे वातावरण तयार झाले होते. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी माथेफिरूला ताब्यात घेऊन सिटी कोतवाली पोलिसांकडे सोपविल्याची सूत्रांची माहिती आहे.
पातूर तालुक्यातील गावंडगाव येथील रामेश्वर मोहन राठोड ( ३१) याने सर्वोपचारमध्ये उभ्या असलेल्या शेख नजीर शेख सैपान रा. अकोला यांच्या रुग्णवाहिका एमएच ३० बीडी ११०२, एमएच २८ एबी ७७४७ अशा दोन रुग्णवाहिका तर अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील विनोद बळीराम सोनी यांची एमएच २७ बीव्ही १६२७ क्रमांकाची कार फोडली. उपस्थितांनी पोलिसांना याबाबत माहिती देऊन माथेफिरूला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. दरम्यान या प्रकारामुळे सर्वोपचार रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (प्रतिनिधी)