ट्रकने दोन महिला मजुरांना उडविले; एक महिला जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 18:45 IST2020-09-07T18:45:17+5:302020-09-07T18:45:32+5:30
एक महिला जागीच ठार झाली, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली.

ट्रकने दोन महिला मजुरांना उडविले; एक महिला जागीच ठार
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी-पिंपळखुटा मार्गावर भरधाव ट्रकने दोन महिला मजुरांना उडविल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. यात एक महिला जागीच ठार झाली, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली.
प्रमोद ताले यांच्या शेतात उडिदाच्या शेंगा तोडण्यासाठी सोमवारी सकाळी चान्नी येथील शीलाबाई शांताराम सदार, बेबी दयाराम सोनोने या दोन महिला मजूर पायी जात होत्या. चान्नीहून पिंपळखुटाकडे जाणाऱ्या एमएच १४ ए- ७२४५ क्रमांकाच्या वाहनाने दोन्ही मजूर महिलांना जबर धडक दिली. यात शीलाबाई शांताराम सरदार ही महिला जागीच ठार झाली, तर बेबी दयाराम सोनोने ही महिला गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच, चान्नीचे प्रभारी ठाणेदार उपनिरीक्षक रामराव राठोड, पोलीस कर्मचारी पंचभाई, संतोष जाधव, बालाजी सानप, रावसाहेब बुधवंत, किरण गवई यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह व गंभीर जखमी महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे पाठविले. अपघातानंतर वाहनचालक व मजूर ट्रक सोडून घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणात चान्नी पोलिसांनी चालकाविरुद्ध भादंवि कलम ३0४ अ, २७९, ३३८ व १३४ नुसार गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)