अकोला: श्री राजराजेश्वर कावड-पालखी सोहळ्यातील सर्वांत मोठी कावड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाबकी रोडवासी कावडमध्ये सहभागी झालेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला रविवारी रात्री अकोल्यातील दगडीपुलाजवळ अपघात घडला. या दुर्घटनेत ट्रॅक्टरमधील २२ भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
घटनेची माहिती मिळताच भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी घटनास्थळी धावले आणि जखमींवर उपचार करण्यासाठी त्यांना तातडीने मदत मिळवून दिली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांना जखमींची योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात. घटनेमुळे काही काळ कावड महोत्सव थांबवला गेला होता. पोलिसांनी रस्ता मोकळा करून जखमींना अकोल्यात दाखल केले. त्यानंतर भाविकांनी पूर्णा नदीचे जल घेऊन राजराजेश्वराला अभिषेक करण्यासाठी आपला पुढील प्रवास सुरू केला.
पोलिसांची खबरदारी
अपघातानंतर पोलिसांनी रस्ता मोकळा करून जखमी भाविकांना उपचारासाठी तातडीने रवाना केले. या दुर्घटनेमुळे कावडयात्रा काही काळासाठी थांबविण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून मार्ग मोकळा केल्यांतर भाविकांनी पुन्हा उत्साहाने कावडयात्रा पुढे सुरू केली. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करीत जखमी भाविकांच्या उपचारांसाठी पुढाकार घेतल्याने कावडयात्रा सुरळीत सुरू झाली.