दिवाळीच्या रात्री अकोल्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 13:10 IST2025-10-22T13:09:04+5:302025-10-22T13:10:58+5:30
ही घटना मंगळवारी (२१ ऑक्टोबर) रात्री सुमारे ९:४५ वाजता घडली.

दिवाळीच्या रात्री अकोल्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, एक जखमी
बोरगाव मंजू (जि. अकोला) : दिवाळीच्या रात्री बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पैलपाडा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (२१ ऑक्टोबर) रात्री सुमारे ९:४५ वाजता घडली.
मृतांमध्ये धिरज सिरसाठ, त्यांची पत्नी अश्विनी सिरसाठ (रा. भीमनगर, बोरगाव मंजू) आणि आरिफ खान (रा. बोरगाव मंजू) यांचा समावेश आहे. ते तिघेही चायनीज नाश्ता गाडीचा व्यवसाय करत होते. कारंजा तालुक्यातील खेर्डा येथे काम आटोपून ते आपल्या एमएच ३० एबी २००६ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने परत येत होते. कुरणखेड परिसरात वाहन बंद पडल्याने त्यांनी बोरगाव मंजू येथील मालवाहतूक गाडीच्या मदतीने टोचन करून आणले. दोन्ही वाहने कुरणखेड आणि पैलपाडा गावाच्या दरम्यान महामार्गावर थांबली असताना चालक टायर तपासण्यासाठी खाली उतरल्यानंतर भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने चौघांना जोरदार धडक दिली. या अपघातात अन्वर खान हे किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, पोलीस निरीक्षक अनिल गोपाल, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, धुळे, सचिन सोनटक्के आणि नारायण शिंदे यांनी पाहणी केली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी तपास केला. मृतदेह आपत्कालीन बचाव पथकाच्या मदतीने मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातानंतर दोन तास महामार्गावरील वाहतूक अडथळा निर्माण झाल्याने एकतर्फी करण्यात आली होती.