अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील सोनाळा, हंेडज, देवरण आणि पळसोडा येथील काही ग्रामस्थांना कमाल जमीन धारणा अधिनियमानुसार सिलिंगच्या जमिनीचे वाटप करण्यात आले; परंतु १९९०, १९९९ आणि २००६ मध्ये वाटप करण्यात आलेल्या या जमिनीचा ताबा अद्यापही लाभार्थींना मिळाला नसून, या लाभार्थींनी जिल्हाधिकार्यांकडे जमिनीचा ताबा मिळण्याची मागणी करणारे निवेदन दिले असून, जमिनीचा ताबा मिळाला नाही, तर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.महाराष्ट्र शेतजमीन कमाल धारणा अधिनियम १९६१ च्या कलम २१ नुसार संबंधितांकडे अतिरिक्त जमीन असल्याचे आढळल्यानंतर त्या जमिनीचा मालकी हक्क घोषित तारखेपासून शासनाकडे वर्ग होत असतो. या कायद्यानुसार शेती वाहणार्या भूमिहीनांना सिलिंग अंतर्गत त्या जमिनीचा ताबा देण्यात येतो. असे असले तरी या जमिनीची मालकी सरकारकडे राहते. त्या जमिनीची खरेदी किंवा विक्री होऊ शकत नाही. याच सिलिंग कायद्यांतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज, सोनाळा, पळसोडासह परिसरातील ८ लाभार्थींना १९९० मध्ये, देवरण आणि परिसरातील ५ लाभार्थींना १९९९ मध्ये, तर २००६ ला हेंडज, पळसोडा आणि देवरण येथील १० लाभार्थींना तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी यांनी जमिनीचे वाटप केले; परंतु या लाभार्थीपैकी एकालाही अद्याप या जमिनीचा ताबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे सिलिंग कायद्यांतर्गत जमीन मिळूनही या लाभार्थींना कसलाही फायदा झालेला नाही. ही जमीन ज्यांच्याकडे आहे, ते लोक लाभार्थी जमिनीचा ताबा घेण्यासाठी तेथे गेल्यास त्यांना धमकी देऊन हाकलून देतात. या संदर्भात लाभार्थींनी वारंवार तहसीलदार, उपविभागीय अधिकार्यांना निवेदन दिले; परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. या संदर्भातील नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालनही त्यांच्याकडून करण्यात आले नाही. त्यामुळे कंटाळलेल्या लाभार्थींनी या संदर्भात जिल्हाधिकार्यांकडे निवेदन देऊन जमिनीचा ताबा मिळण्याची मागणी केली आणि ताबा न मिळाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही या लाभार्थींनी दिला आहे.
सिलिंगच्या जमिनीचा ताबा द्या अन्यथा आत्मदहन
By admin | Updated: June 7, 2014 23:57 IST