बसच्या बाहेर उचलून फेकल्याने वाचलो, अपघातातील जखमी मावशीने दिली माहिती, मुंबईला जाताना घडला दुर्दैवी अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 17:46 IST2022-10-08T17:42:58+5:302022-10-08T17:46:46+5:30
वाशिम जिल्ह्याच्या रिसाेड तालुक्यातील केनवडचे रहिवासी शे. इस्माईल आहेत. त्यांची बहीण जैतूनबी पठाण या बुलडाणा जिल्ह्यातील लाेणारला राहतात.

बसच्या बाहेर उचलून फेकल्याने वाचलो, अपघातातील जखमी मावशीने दिली माहिती, मुंबईला जाताना घडला दुर्दैवी अपघात
राजरत्न सिरसाट -
अकोला: बसचा अपघात घडताच काेणीतरी आम्हाला उचलून बाहेर फेकले. त्यामुळे आमचे प्राण वाचले, असे अपघातातील जखमी माझ्या मावशीने सांगितले, अशी माहिती शे. खलील शे. इस्माईल यांनी शनिवारी भ्रमणध्वणीवरून ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.
जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या बहिणीला बघायला या बसने माझे वडील व मावशी मुंबईला जात हाेते, अशातच नाशिक येथे हा भीषण अपघात घडला. या अपघातात वडिलांच्या दाेन्ही पायांना फ्रॅक्चर झाले असून, मावशीच्या कंबरेला जबर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर नाशिकच्या सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
वाशिम जिल्ह्याच्या रिसाेड तालुक्यातील केनवडचे रहिवासी शे. इस्माईल आहेत. त्यांची बहीण जैतूनबी पठाण या बुलडाणा जिल्ह्यातील लाेणारला राहतात. यांची बहीण आजारी असल्याने मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना बघण्यासाठी शे. इस्माईल व जैतूनबी पठाण यांनी मालेगाव येथून या बसमध्ये प्रवास सुरू केला; परंतु नाशिकला झालेल्या अपघातानंतर बसने पेट घेतला. या अपघातात हे दाेघेही जखमी झाले आहेत. शे. इस्माईल यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, तर त्यांची बहीण जैतूनबी यांच्यावर उपचार सुरू आहेत; परंतु शे. इस्माईल सध्या बेशुद्धावस्थेत असल्याने त्यांच्यासाेबत बाेलणे झाले नसल्याचे शे. खलील यांनी सांगितले. शे. खलील हे मुंबईला राहतात. अपघाताची माहिती कळताच ते नाशिकला आले आहेत.