स्वपक्षीय मंत्र्याच्या विरोधातील उपोषणकर्त्यांना खासदारांचे पाठबळ!

By Admin | Updated: August 27, 2015 00:56 IST2015-08-27T00:56:30+5:302015-08-27T00:56:30+5:30

जिल्हाधिका-यांच्या आश्‍वासनानंतर आदिवासी शेतकर्‍यांचे उपोषण मागे.

Supporters of the Opposition to support the Opposition Minister! | स्वपक्षीय मंत्र्याच्या विरोधातील उपोषणकर्त्यांना खासदारांचे पाठबळ!

स्वपक्षीय मंत्र्याच्या विरोधातील उपोषणकर्त्यांना खासदारांचे पाठबळ!

अकोला: स्वपक्षीय मंत्र्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मंगळवारपासून उपोषणास बसलेल्या आदिवासी शेतकर्‍यांना पाठबळ देत, खासदार संजय धोत्रे यांनी बुधवारी उपोषणाच्या सांगतेसाठी पुढाकार घेतला. खासदारांनी दुपारी उपोषण मंडपाला भेट देऊन मध्यस्थी केल्यानंतर, शेतकर्‍यांनी सायंकाळी उपोषण मागे घेतले. आपल्या मालकीची गट नं.२२ आणि २४ मधील अनुक्रमे १.२१ हेक्टर आणि १.६२ हेक्टर जमीन, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या हस्तकांनी अवैध सावकारी मार्गाने बळकावल्याचा आरोप, मुंगशी येथील गणेश मधुकर चव्हाण व सुरेश मधुकर चव्हाण यांनी केला असून, पुढे तीच जमीन डॉ.रणजित पाटील यांनी स्वत:च्या नावे करून घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अनुसूचित जमातीच्या व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीचे व्यवहार किंवा हस्तांतरण करून त्यांना भूमिहीन करण्यास कायद्यानुसार प्रतिबंध असताना, बेकायदेशीररीत्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्याचे चव्हाण बंधूंचे म्हणणे आहे. याच कारणावरून त्यांनी मंगळवार, २५ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. स्वपक्षाच्या मंत्र्याच्याविरोधात उपोषणास बसलेल्या शेतकर्‍यांची भेट घेऊन खासदार संजय धोत्रे यांनी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याशी चर्चा केली. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी मूर्तिजापूर तहसीलदारांना निर्देश देत, महिनाभरात प्रकरणाचा निपटारा करण्याचे आश्‍वासन दिले. जिल्हाधिकार्‍यांच्या आश्‍वासनानंतर व खा.धोत्रे यांच्या मध्यस्थीने उपोषणकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी उपोषण मागे घेतले. खा.धोत्रे यांनी उपोषणकर्त्यांना मोसंबीचा रस पाजल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष अजाबराव उईके, विक्रांत काटे व इतर उपस्थित होते.

Web Title: Supporters of the Opposition to support the Opposition Minister!