अकोल्यात सहा केंद्रांवर १५ नोव्हेंबरपासून हमी दराने होणार सोयाबीन खरेदी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 20:16 IST2025-11-11T20:06:48+5:302025-11-11T20:16:20+5:30
Akola : १२ हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी; दैनंदिन 'मेसेज' नुसार होणार मोजणी

Soybean will be purchased at guaranteed rates from November 15th at six centers in Akola!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात सहा केंद्रांवर येत्या १५ नोव्हेंबरपासून हमी दराने सोयाबीनची खरेदी सुरू होणार आहे. त्यासाठी सुरू असलेल्या नोंदणी प्रक्रियेत १० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ११ हजार ९५७सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.
सततचा पाऊस आणि अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून, जिल्ह्यात सरासरी एकरी एक ते तीन क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. प्रतिक्विंटल ५ हजार ३२८ रुपये सोयाबीन खरेदीचे दर असले तरी, त्या तुलनेत बाजारात हमी दरापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे. त्यामुळे हमी दराने सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती.
३० ऑक्टोबरपासून नोंदणीला सुरुवात
बाळापूर, पातूर व बार्शिटाकळी हे तीन खरेदी जिल्हा मार्केटींग अधिकारी आणि अकोला, अकोट व मूर्तिजापूर हे तीन खरेदी केंद्रे विदर्भ मार्केटिंग फेडरेशनमार्फत सुरु करण्यात येणार असून, या केंद्रांवर हमी दराने सोयाबीन खरेदीचे नियोजन करण्यात आहे. हमी दराने सोयाबीन खरेदीसाठी ३० ऑक्टोबरपासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये १० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ११ हजार ९५७ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून नोंदणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.