Hidayat Patel: काँग्रेसचे जेष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला; प्रकृती चिंताजनक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:28 IST2026-01-06T15:25:09+5:302026-01-06T15:28:18+5:30
Hidayat Patel Health Update: महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि जेष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर आज अकोट तालुक्यातील माहोळ गावात अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला.

Hidayat Patel: काँग्रेसचे जेष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला; प्रकृती चिंताजनक!
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि जेष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर आज अकोट तालुक्यातील माहोळ गावात अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात पटेल गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत पटेल हे माहोळ गावात असताना काही जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पोटावर आणि मानेवर खोलवर जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर परिसरात मोठी पळापळ झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पटेल यांना तातडीने अकोट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जखमा गंभीर असल्याने आणि रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले.
राजकीय वैमनस्याचा संशय
राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशा परिस्थितीत अकोल्यातील एका बड्या नेत्यावर हल्ला झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. हा हल्ला राजकीय वादातूनच झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हिदायत पटेल हे अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे वजनदार नेते मानले जातात. त्यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
हिदायत पटेल यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी कळताच अकोला आणि अकोटमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अकोला पोलिसांनी शहरात आणि माहोळ गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, लवकरच अटकेची कारवाई केली जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.