अकोल्यातील दुर्घटनेचे वृत्त वेदनादायी, फडणवीसांकडून ट्विटरद्वारे शोक व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 23:46 IST2023-04-09T23:38:17+5:302023-04-09T23:46:35+5:30
याबाबत माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ मदतीच्या सूचना दिल्या आहेत.

अकोल्यातील दुर्घटनेचे वृत्त वेदनादायी, फडणवीसांकडून ट्विटरद्वारे शोक व्यक्त
पारस ( जि. अकोला) : बाबूजी महाराज संस्थानात आयोजित दु:ख निवारण कार्यक्रमासाठी रविवार, ९ एप्रिल रोजी भाविक एकत्र आले होते. दरम्यान, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटल्याने कडुलिंबाचे झाड सभामंडपावर कोसळले. या मंडपाखाली दबून सात भाविकांचा मृत्यू झाला, ५ गंभीर जखमी तर ४० जण जखमी झाल्याची माहिती आहे. याबाबत माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ मदतीच्या सूचना दिल्या आहेत.
अकोला जिल्ह्यातील पारस येथे एका धार्मिक समारंभासाठी काही लोक एकत्र आले असता, टिनाच्या शेडवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून जखमींवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी ते समन्वय ठेवून आहेत. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिलीय. तसेच, काही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून किरकोळ जखमींवर बाळापूर येथे उपचार करण्यात येत आहेत. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
५० जण दबल्याची भीती
पारस येथील बाबूजी महाराज संस्थान येथे दर रविवारी जिल्हाभरातील भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी रात्री १० वाजता ‘दु:ख निवारण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या तयारीत मंदिराच्या बाजूच्या सभामंडपात भाविक एकत्र आले होते. दरम्यान, सायंकाळी वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा सुटला. या वादळी वाऱ्यामुळे मंदिराच्या बाजूला असलेले कडुलिंबाचे झाड सभामंडपावर कोसळले. त्यामुळे सभामंडप व झाड अंगावर पडल्याने जवळपास ५० जण दबल्याची माहिती समोर येत असून, या घटनेत सात जण ठार झाल्याची माहिती ठाणेदारांनी दिली. यात चार महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटू शकले नाही.
अकोला जिल्ह्यातील पारस येथे एका धार्मिक समारंभासाठी काही लोक एकत्र आले असता, टिनाच्या शेडवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 9, 2023
मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली…
दरम्यान, या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी जखमी भाविकांना बाहेर काढून उपचारार्थ रुग्णालयात रवाना केले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. बाळापूर पाेलिस घटनास्थळी पोहोचले असून, बचावाचे कार्य सुरू आहेत.
टिनपत्रे, सौर पॅनल उडाले!
वादळी वाऱ्यामुळे पारस येथे अनेक घरांवरील टिनपत्रांसह सौर ऊर्जेचे पॅनल उडाले. त्यापाठोपाठ अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने घरातील साहित्य भिजले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.