लाचखोर तलाठी पोलिसांना शरण; बुधवारपर्यंत पोलिस कोठडी
By Admin | Updated: May 13, 2014 21:07 IST2014-05-13T20:18:31+5:302014-05-13T21:07:51+5:30
विम्याचे पैसे व बहिणीच्या नावे शेतीची हक्क नोंदणी करण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचा प्रयत्न करणार्या बार्शिटाकळी येथील तलाठी दर्शन चव्हाण हा सोमवारी उशिरा रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांसमोर शरण आला.

लाचखोर तलाठी पोलिसांना शरण; बुधवारपर्यंत पोलिस कोठडी
अकोला: विम्याचे पैसे व बहिणीच्या नावे शेतीची हक्क नोंदणी करण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचा प्रयत्न करणार्या बार्शिटाकळी येथील तलाठी दर्शन चव्हाण हा सोमवारी उशिरा रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांसमोर शरण आला. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १४ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
प्रवीण खरबडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे मयत जावई यांच्या विम्याचे पैसे व बहिणीच्या नावे शेतीची हक्क नोंदणी करण्यासाठी बार्शिटाकळी तहसील कार्यालयातील तलाठी दर्शन चव्हाण यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली; परंतु प्रवीण खरबडकर हे १५ हजार रुपयांची लाच द्यायला तयार नसल्याने त्यांच्यामध्ये १३ हजार रुपये देण्याची तडजोड झाली. खरबडकर यांनी ४ एप्रिल २0१४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी ४ एप्रिलाच दुपारी बार्शिटाकळी तहसील कार्यालयामध्ये सापळा रचला. दरम्यान, पडताळणी पंचनामाप्रमाणे तलाठी दर्शन चव्हाण याने १३ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केला. सापळ्यादरम्यान तलाठ्याला संशय आल्यामुळे तो पसार झाला. बार्शिटाकळी पोलिसांनी त्याच्यावर कलम ७, १५ लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तलाठी दर्शन चव्हाण हा तब्बल महिनाभर फरार होता. पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. अखेर सोमवारी उशिरा रात्री लाचखोर तलाठी दर्शन चव्हाण हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांसमोर शरण आला. पोलिसांनी त्याला अटक करून मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १४ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.