Akola Municipal Election 2026: अकोला महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच शहराच्या राजकारणात प्रचंड हालचालींना वेग आला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असतानाच, महापालिकेत दुसरा मोठा पक्ष म्हणून पुढे आलेल्या काँग्रेसनेही पुढाकार घेत भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेतील सत्तासंघर्ष अधिकच रंगतदार झाला आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ३८ नगरसेवक निवडून आले असून, साध्या बहुमतासाठी त्यांना अवघ्या तीन नगरसेवकांची गरज आहे. दुसरीकडे काँग्रेसचे २१ नगरसेवक विजयी झाले असून, उध्दवसेनेचे सहा, वंचितचे पाच, राष्ट्रवादी (शरद पवार)-तीन, एमआयएमचे तीन नगरसेवक आहेत.
राष्ट्रवादी (अजित पवार) चा एक, शिंदेसेनेचा एक, महानगर विकास समितीचा एक आणि एक अपक्ष नगरसेवक आहे. त्यामुळे ४१ चा 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी दोन्ही प्रमुख पक्षांकडून डावपेच आखले जात आहेत.
काँग्रेसकडून भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र येण्याची हाक देत आघाडी सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे भाजपने मात्र गोपनीयता पाळत रणनीती आखली असून, दोन राजकीय पक्षांचे मिळून सहा नगरसेवक गळाला लावल्याची खात्रीलायक माहिती आहे. निकाल जाहीर होताच भाजपने सत्ता मिळवण्यासाठी 'फिल्डिंग' लावली असून, विविध पक्षांच्या नगरसेवकांशी थेट संवाद साधला आहे.
१० नगरसेवक भाजपच्या गळाला?
भाजपकडे एका राजकीय पक्षाचे चार, दुसऱ्या पक्षाचे तीन, एका पक्षाचा एक, एक अपक्ष आणि एक इतर असे दहा नगरसेवक असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे भाजपकडे महापालिका सभागृहातील संख्याबळ ४८ पर्यंत गेल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी काहींनी गट स्थापन करण्याची तयारी केल्याचीही माहिती आहे.
छोट्या पक्षांवर लक्ष!
पक्षांतरविरोधी कायदा नगरसेवकांनाही लागू असून, एखाद्या पक्षाचे दोन-तृतियांश किंवा त्यापेक्षा नगरसेवक वेगळे झाल्यास, ती पक्षातील फूट मानली जाते आणि त्या नगरसेवकांचे पद कायम राहते. कायद्यातील याच तरतुदीचा लाभ घेत संख्याबळ वाढवण्याचे आणि सभागृहात बहुमत मिळविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी संख्याबळ कमी असलेल्या पक्षांवर नजर ठेवली जात आहे.
पहिल्या दिवसापासून फोडाफोडी
पहिल्याच १ दिवसापासून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले असून, पडद्यामागे बैठका, चर्चा आणि वाटाघाटींचे सत्र सुरू आहे. कोणता पक्ष 'मॅजिक फिगर' गाठून सत्ता स्थापन करतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. सध्या तरी महापालिकेच्या सत्तेसाठी सुरू असलेली रस्सीखेच उत्सुकता निर्माण करणारी आहे.
Web Summary : Akola's municipal election sparks intense political activity. BJP and Congress vie for power, strategizing to reach the magic number. Horse-trading begins.
Web Summary : अकोला नगर निगम चुनाव के बाद राजनीतिक सरगर्मी तेज। भाजपा और कांग्रेस सत्ता के लिए प्रयासरत, जोड़-तोड़ जारी। बहुमत जुटाने की कवायद।