वनराई बंधाऱ्यातून होणार १०० एकरावर सिंचन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 13:32 IST2019-12-04T13:32:25+5:302019-12-04T13:32:39+5:30
परिसरातील ३५ शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वनराई बंधाऱ्यातून होणार १०० एकरावर सिंचन!
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला : दरवर्षी दुष्काळी स्थिती आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी भंडारज बु.च्या ग्राम एकता जलसंवर्धन समितीने मोहाडी नाल्यावर वनराई बंधारा उभारला. यावर्षी आॅक्टोबरपर्यंत पाऊस झाल्याने हा वनराई बंधारा तुडुंब भरला आहे. त्यामुळे यावर्षी वनराई बंधाºयाच्या पाण्यावर परिसरातील १०० एकरावर सिंचन होणार आहे. परिसरातील ३५ शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
भंडारज बु. परिसरात दरवर्षी अल्प पाऊस असल्यामुळे दुष्काळी स्थिती असते. तसेच पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. जलपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने सिंचन करणे जिकिरीचे झाले होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्राम एकता जलसंवर्धन समितीचे अध्यक्ष माजी सरपंच दीपक इंगळे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील पहिला वनराई बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाºयामुळे परिसरातील ३५ विहिरींची पाण्याची पातळी वाढली असून, ती उन्हाळ्यातही कायम राहणार आहे. मोहाडी नाल्यावर दोन मीटर रुंदीच्या बंधाºयाचे पाणी दीड किमी लांब पसरले आहे. या बंधाºयात अठरा कोटी लीटर जलसाठा जमा झाला असून, ओव्हर फ्लो कायम आहे. या बंधाºयास पाच मीटर लांब प्लास्टिक कापड लागला आहे. तीन हजार रुपये खर्च आला आहे. शेतातील हिरवा झाडपाला, तरोटे, गवत याचा अंतर्भाव आहे. पर्यावरणपूरक हा बंधारा अतिशय कमी खर्चात अधिक लाभदायक असून, कमी वेळात तयार होते. याचे शास्त्रीय नाव शिवज्योती बंधारा आहे. शास्त्रोक्त मार्गदर्शन कृषी सहायक भाष्कर इंगळे यांनी दिले आहे. बंधारा निर्मिती ग्राम एकता जलसंवर्धन समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच दीपक इंगळे, गुणसागर इंगळे, राजकुमार मुरलीधर इंगळे, नारायण शेंडे, शेषराव सुरवाडे, सुरेंद्र सुरवाडे, शेषराव सुरवाडे, बाळू अमानकर, शिवाजी अमानकर, प्रमोद इंगळे या शेतकºयांनी सहकार्य केले.
सिंचनात होणार वाढ!
यावर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता. तसेच अनेक नद्या दुथळी भरून वाहत आहेत. त्यामुळे भंडारज बु. येथील मोहाडी नाल्यावर बांधलेल्या बंधाºयात मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाला आहे. परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. तसेच जलपातळीत वाढ झाल्याने पाणीटंचाई दूर होणार असल्याचे चित्र आहे.