बेफिकिरी वाढली...कोरोनाही वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:04 PM2020-09-07T12:04:34+5:302020-09-07T12:04:44+5:30

रस्ते, बाजारपेठा, बसस्थानकांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असून, कोविड प्रतिबंधात्मक नियमांना बगल दिल्या जात असल्याने संपर्कातून संसर्ग वाढत आहे.

Increased insecurity ... Corona also increased! | बेफिकिरी वाढली...कोरोनाही वाढला!

बेफिकिरी वाढली...कोरोनाही वाढला!

Next

अकोला : ‘अनलॉक’च्या या प्रक्रियेत कोरोनाही ‘अनलॉक’ झाला असून, अकोलेकरांंच्या बेफिकिरीमुळे या अत्यंत घातक विषाणूचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रस्ते, बाजारपेठा, बसस्थानकांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असून, कोविड प्रतिबंधात्मक नियमांना बगल दिल्या जात असल्याने संपर्कातून संसर्ग वाढत आहे.
कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात असून, हळूहळू अनेक क्षेत्र खुली होत आहेत. ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनलॉक-४ सुरू झाला असून, यामध्ये अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आतापर्यंत बंद असलेली एसटीची प्रवासी वाहतूक सेवाही बहाल करण्यात आली असून, आंतरजिल्हा प्रवासासाठी आवश्यक असलेली ई-पासची अटही रद्द करण्यात आली आहे. या विविध सवलती दिल्या जात असताना नागरिकांनी मास्क परिधान करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे; परंतु अनलॉकच्या प्रक्रियेत नागरिक अधिक बेफिकीर झाल्याचे चित्र अकोला शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे. यामुळे आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांत १३ मृत्यू व ५७६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडाही हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. वाढत्या रुग्णांचा भार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयावर येत आहे. या ठिकाणी अपुºया मनुष्यबळामुळे रुग्णसेवा प्रभावित होत आहे.

ना मास्क...ना फिजिकल डिस्टन्सिंग
एकीकडे अकोल्यात कोरोना थैमान घालत आहे, तर दुसरीकडे नागरिकांची बेफिकिरी वाढली आहे. शहरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडत आहे. मास्क वापरण्याकडेही नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानक, दुकानांमध्ये अनेक जण बिनधास्तपणे विनामास्क वावरत असल्याचे दिसून येत आहे. या बेफिकिरीमुळे कोरोना संसर्गाचा वेग वाढत आहे.

कारवाईचा धाकही संपला!
कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मनपा व जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मास्कचा वापर न करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे व रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. यासाठी पथकही गठित करण्यात आले होते. नियमांचे उल्लंघन करणाºयांना मोठा दंड आकारण्यात येत होता. आता मात्र ही कारवाईच गुंडाळण्यात आली आहे. कारवाईचा धाकच नसल्याने नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत आहे.

 

Web Title: Increased insecurity ... Corona also increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.