'आई-बाबा मतदान कराच' उपक्रमाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 14:26 IST2019-03-27T14:25:39+5:302019-03-27T14:26:06+5:30
अकोला: मतदान हा भारतीय संविधानाने दिलेला सर्वोच्च हक्क आहे. या हक्काप्रती नागरिकांना जागृत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘आई-बाबा मतदान कराच’, या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रभात किड्स स्कूल २६ मार्च रोजी करण्यात आले.

'आई-बाबा मतदान कराच' उपक्रमाचे उद्घाटन
अकोला: मतदान हा भारतीय संविधानाने दिलेला सर्वोच्च हक्क आहे. या हक्काप्रती नागरिकांना जागृत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘आई-बाबा मतदान कराच’, या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रभात किड्स स्कूल २६ मार्च रोजी करण्यात आले.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मतदान जागृतीसंदर्भात जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयांना केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत प्रभात किड्स स्कूलमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यांतर्गत तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी पालकांना पत्र लिहून येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची विनंती केली व एक विक्रम प्रस्थापित केला.
यावेळी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, नोडल अधिकारी मनोज लोणारकर, गुणवत्ता विकास अधिकारी प्रकाश अंधारे यांच्यासह प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, वंदना नारे, सचिव नीरज आवंडेकर, प्राचार्य कांचन पटोकार व उपप्राचार्य वृषाली वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते. देशाच्या सुदृढ आणि निकोप लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय जनतेने संविधान अंगीकृत केले. मतदान करणे हा नागरिकांचा सर्वांचा हक्क तर आहेच, सोबत कर्तव्यदेखील आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. पालक मुलांचं ऐकतात. जर मुलांनी त्यांच्या आई-बाबा, आजी-आजोबा, ताई-भाऊंना मतदान करण्याचा हट्ट केला तर ते ऐकतीलच. त्यामुळे मुलांनी त्यांच्या सुवाच्य अक्षरात पालकांना पत्र लिहून मतदानाची विनंती करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले. प्रास्ताविक ‘प्रभात’चे संचालक डॉ. गजानन नारे यांनी केले. संचालन डॉ. प्रदीप अवचार यांनी केले.
दोन हजार विद्यार्थ्यांचे पालकांना पत्र!
‘प्रभात’च्या नियमित प्रार्थनेनंतर घेण्यात आलेल्या या उपक्रमात प्रभातच्या तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत त्यांच्या पालकांना पत्र लिहिले आणि मतदान करण्याची विनंती केली आहे.