हुक्का पार्टी भोवली; नऊ शिक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:08 IST2019-06-05T12:08:18+5:302019-06-05T12:08:32+5:30
पातूर तालुक्यातील आठ, अकोला तालुक्यातील एका शिक्षकाला निलंबित करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला.

हुक्का पार्टी भोवली; नऊ शिक्षक निलंबित
अकोला : विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्काराचे धडे देणारे शिक्षक सार्वजनिक ठिकाणी नशापान करताना आढळल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली; मात्र प्रशासकीय कारवाई अनेक महिने रखडली. अखेर मंगळवारी पातूर तालुक्यातील आठ, अकोला तालुक्यातील एका शिक्षकाला निलंबित करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला. परभणी जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या शिक्षकावर कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले. शिक्षणाधिकारी वैशाली ठग रूजू झाल्यानंतर मुख्यालयासह निलंबनाचे आदेश दिले जाणार आहेत.
अकोला-नांदेड महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये शिक्षकांनी नशापानासाठी हुक्का प्राशन केल्याची घटना पोलिसांच्या छाप्यात उघड झाली होती. त्यावेळी पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई केली. तर पुढील प्रशासकीय कारवाईसाठीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवला. शिक्षण विभागाने त्यानुसार कारवाईचा प्रस्तावही तयार केला; मात्र त्यावर निर्णयच झाला नाही. त्यामुळे शिक्षण समिती, स्थायी समितीच्या सभेत वारंवार हा मुद्दाही उपस्थित झाला. कारवाईच होत नसल्याने हा मुद्दा मागे पडला होता. दरम्यान, याप्रकरणी पुन्हा एकदा कारवाईची मागणी पुढे आली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी कारवाईचा आदेश दिला.
- निलंबित झालेले शिक्षक
पातूर तालुक्यातील कोसगाव जिल्हा परिषद शाळेतील विजय भुतकर, अंधारसावंगी-संतोष राठोड, गावंडगाव- सुनील गवळी, गोंधळवाडी- सुखदेव शिंदे, मलकापूर (फॉ.)-दिनेश केकण, विवरा-संजय इंगळे, नांदखेड- अनिल दाते, कारला- गोपीकृष्ण येनकर, अकोला तालुक्यातील हिंगणा बारलिंगा येथील धीरज यादव यांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे, तर परभणी जिल्हा परिषदेत बदली झाल्याने महेश मानकरी या शिक्षकावर कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले.
- सतत गैरहजर शिक्षकांना इशारा
जिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्त चार शिक्षक गेल्या काही वर्षांपासून सतत गैरहजर आहेत. त्यांना १० जून रोजी म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. त्यादिवशी उपस्थित न राहिल्यास एकतर्फी कारवाईचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिला आहे. त्यासाठी पातूर तालुक्यातील सावरखेड शाळेतील राजेश विष्णूपंत तळोकार, अकोला तालुक्यातील खडका येथील विजय किसन तायडे, तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील संजय महादेव वानखडे, बाळापूर तालुक्यातील लोहारा येथील अरविंद हिरामण बुरुकले यांना नोटीस देण्यात आली आहे.