वसतिगृहातील मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
By नितिन गव्हाळे | Updated: June 27, 2023 18:34 IST2023-06-27T18:34:39+5:302023-06-27T18:34:52+5:30
याप्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी नोंद केली आहे.

वसतिगृहातील मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
अकोला : शहरातील शास्त्रीनगरात मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीने तिच्या खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा ११ वाजेच्या सुमारास समोर आली. आत्महत्या केलेली मुलगी ही मुक्ताईनगरची होती. तिच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी नोंद केली आहे.
लक्ष्मीपार्वती चंद्रकांत बोदडे(१७) ही मुलगी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरची राहणारी होती. ६ जून रोजी ती वसतिगृहात राहायला आली होती. तिने नीट परीक्षेच्या तयारीसाठी शिकवणी वर्ग लावला होता. तिचे वडील पोलिस दलात कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मीपार्वती ही तणावात वावरत होती. ती हाताने दिव्यांग होते. ती फारसी कोणाशीही बोलत नव्हती. तिची रूममेट ही लग्ना समारंभासाठी बाहेरगावी गेली होती. रविवारी रात्री १० वाजेनंतरही लक्ष्मीपार्वती ही जेवणासाठी आली नाही. तिच्या मैत्रिणींनीही फोन करून तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
पण, तिच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर स्वयंपाक करणारी महिला आणि तिच्या मैत्रिणी तिला बोलवण्यासाठी तिच्या रूमवर पोहोचल्या. पण, तिच्या खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता. काही तरुणींनी खिडकीतून डोकावून पाहिले. यावेळी तिने गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. पोलिसांनी मजुरांना बोलावून रूमच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर तिचा मृतदेह मध्यरात्रीनंतर सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. पुढील तपास पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे करीत आहेत.