High risk individuals will now have a 'Rapid Antigen Test'! | आता अतिजोखमीच्या व्यक्तींचीच होणार ‘रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट’!

आता अतिजोखमीच्या व्यक्तींचीच होणार ‘रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट’!

अकोला : महापालिका क्षेत्रातून ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे रॅपिड टेस्टच्या माध्यमातून जलद गतीने तपासण्या करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पातूरमध्ये रॅपिड टेस्टची मोहीम राबविल्यानंतर आता केवळ अतिजोखमीच्या व्यक्तींचीच टेस्ट केली जाणार आहे. तत्पूर्वी तालुकास्तरावर सर्वेक्षण करून अशा व्यक्तींची यादी तयार केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कंटेनमेन्ट झोनमध्ये रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टच्या माध्यमातून तपासणीला वेग देण्यास पातूर येथून सुरुवात करण्यात आली; परंतु जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये अपेक्षेच्या तुलनेत जास्त किटचा वापर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे यापुढे कंटेनमेन्ट झोनमध्ये सर्वेक्षणानंतरच ‘रॅपिड टेस्ट’ मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आशांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील कंटेनमेन्ट झोनमध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ५० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसह दुर्धर आजार असणाऱ्या हायरिस्कमधील व्यक्तींचा समावेश असणार आहे. सर्वेक्षणाअंती तयार झालेल्या यादीनुसार, संबंधित परिसरात ‘रॅपिड टेस्ट’ मोहिमेचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती आहे.


अशी राबविणार मोहीम
तालुक्याच्या ठिकाणी नगरपालिका व नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षणाची प्रक्रिया राबविली जाईल. तालुक्यातील सर्वेक्षणाची यादी तालुका वैद्यकीय अधिकाºयाकडे दिली जाईल. त्यानंतर संबंधित कंटेनमेन्ट झोनमधील शाळा किंवा समाज मंदिर परिसरात निवडलेल्या लोकांची तपासणी केली जाणार आहे.


जिल्ह्यात १० हजार ‘रॅपिड टेस्ट’ किट

कोविड तपासण्यांचा वेग वाढविण्यासाठी राज्यभरात ‘रॅपिड टेस्ट’ केली जात आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून जिल्ह्याला ५ हजार किट उपलब्ध झाल्या आहेत. तर स्थानिक स्तरावर ५ हजार किटची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात १० हजार ‘रॅपिड टेस्ट’ किट उपलब्ध असून, नियोजनानुसार प्रत्येक तालुक्याला किट पुरविली जाणार आहे.


या आधारावर होईल सर्वेक्षण

  • कंटेनमेन्ट झोन
  • हायरिस्क व्यक्ती
  • गरोदर माता
  • दुर्धर आजार असणारे (५० वर्षावरील)


जिल्ह्यात कोविड टेस्ट झपाट्याने व्हावी, या अनुषंगाने १० हजार रॅपिड टेस्ट किट उपलब्ध झाल्या आहेत. नियोजन करूनच तालुकानिहाय या किटचे वितरण केले जाईल; परंतु तत्पूर्वी प्रत्येक तालुक्यात कंटेनमेन्ट झोनमध्ये सर्वेक्षण केले जाणार असून, ठरलेल्या नियमावलीनुसारच संबंधित व्यक्तीची तपासणी केली आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

Web Title: High risk individuals will now have a 'Rapid Antigen Test'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.