पावसामुळे दाणादाण; नद्या, सिंचन प्रकल्प तुडूंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 03:20 PM2019-11-03T15:20:32+5:302019-11-03T15:21:16+5:30

जिल्हाभरातील शेतकरी संकटात सापडले असून आगामी रब्बी हंगामावरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

Heavy Rain in washim ; Rivers, irrigation projects! | पावसामुळे दाणादाण; नद्या, सिंचन प्रकल्प तुडूंब!

पावसामुळे दाणादाण; नद्या, सिंचन प्रकल्प तुडूंब!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदा आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले असून जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या व सर्वच सिंचन प्रकल्प तुडुंब झाले आहेत. अती पावसामुळे सोयाबिन, तूर, कापूस या पिकांचे प्रचंड नुकसान होण्यासोबतच काहीठिकाणी शेतजमिनी देखील चिबडल्या आहेत. यामुळे जिल्हाभरातील शेतकरी संकटात सापडले असून आगामी रब्बी हंगामावरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री संजय धोत्रे आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी शनिवारी जिल्ह्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये यंदा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पावसाने विश्रांती घेतली होती. तोपर्यंत ६९२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस झाला नाही; मात्र त्यानंतर ऐन सोयाबिन सोंगणीच्या हंगामात अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोंगून आणि ताडपत्रीने झाकून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुड्यांमध्ये पाणी शिरल्याने सोयाबिनला बुरशी चढण्यासोबतच चक्क कोंब फुटल्याचा गंभीर प्रकार घडला. यासह अती पावसामुळे ऐन बहरलेल्या अवस्थेत असलेल्या कपाशीची बोंडे पूर्णत: खराब झाली. तूर या पिकालाही जबर फटका बसला. याशिवाय संत्रा, ऊसाच्या बागा आणि शेवंती, झेंडू यासह अन्य फुलझाडांचेही पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी होऊन जमिनी चिबडल्या आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम तोंडावर असताना या हंगामात पेरणी करण्यासाठी जमिनीची मशागत करणे अवघड झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण आणि पंचनामे करण्याकरिता संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा झटत असल्याचे दिसून येत आहे.
 
पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना इशारा
वाशिम : बुलडाणा जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक पाहून बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग वाढवला अथवा कमी केला जात आहे. तसेच पैनगंगा नदीच्या वरील बाजूस असलेला बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी मध्यम प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला असून त्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता असून वाशिम जिल्ह्यात पैनगंगा नदीवर असलेल्या ११ बॅरेजचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात जावू नये, अथवा आपली जनावरे नदीपात्रात सोडू नयेत, असा इशारा वाशिम पाटबंधारे विभागाने दिला आहे.


पैनगंगेच्या पुरामुळे झाले पिकांचे नुकसान
रिसोड : बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरणातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे पैनगंगा नदीवरील काही बॅरेजेसचे दरवाजे शनिवारी उघडण्यात आले. यामुळे नदीला मोठा पूर येऊन त्याचे पाणी रिसोड तालुक्यातील वाकद या गावातील अनेक शेतकºयांच्या थेट शेतात घुसले. परिणामी, शेतात रचून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुड्या पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. यासह बाळखेडच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाकद व बाळखेड या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असल्याने गावकºयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Web Title: Heavy Rain in washim ; Rivers, irrigation projects!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.