'पैसे दे नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करू' अकोल्याच्या ५१ वर्षीय व्यक्तीवर हनी ट्रॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 18:01 IST2025-09-01T18:00:35+5:302025-09-01T18:01:29+5:30

Akola : बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन अकोला येथील ५१ वर्षीय व्यक्तीकडून १८ लाख ७४ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या मूर्तिजापूर तालुक्यातील एका दाम्पत्याला ग्रामीण पोलिसांनी ३० ऑगस्ट रोजी रंगेहात पकडले.

'Give money or we will file a rape case' Honey trap on 51-year-old man from Akola | 'पैसे दे नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करू' अकोल्याच्या ५१ वर्षीय व्यक्तीवर हनी ट्रॅप

'Give money or we will file a rape case' Honey trap on 51-year-old man from Akola

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर (जि. अकोला) :
बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन अकोला येथील ५१ वर्षीय व्यक्तीकडून १८ लाख ७४ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या मूर्तिजापूर तालुक्यातील एका दाम्पत्याला ग्रामीण पोलिसांनी ३० ऑगस्ट रोजी रंगेहात पकडले. 

प्राप्त माहितीनुसार, अकोला येथील रहिवासी असलले फिर्यादी हे १६ जून २०२५ रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा येथे पैसे जमा करण्यासाठी गेले असता, त्यांची ओळख लता नितेश थोप (वय ३०, रा. खरब ढोरे, ता. मूर्तिजापूर) हिच्याशी झाली. तिने फिर्यादीचा मोबाइल क्रमांक मिळवून वारंवार संपर्क साधला. त्यानंतर २ जुलै रोजी तीने फिर्यादीस आपल्या गावी बोलावले. तेथे तिचा पती नितेश प्रभाकर थोप (३९) अचानक आला व फिर्यादीस धमकावून त्यांचे फोटो काढले. या दाम्पत्याने बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करतो, अशी भीती दाखवून फिर्यादीकडून सुरुवातीला ३ लाख रुपये उकळले. त्यानंतर वेळोवेळी धमकी देत एकूण १८ लाख ७४ हजार रुपये घेतले.

या गुन्ह्यात आरोपींचा सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने आरोपीना अटक करण्यात आली असून, कलम ३०८(२), ३०८ (६), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंदन वानखडे करीत आहेत.

पुन्हा पाच लाखांची मागणी केल्याने अडकले
आरोपींनी फिर्यादीकडे पुन्हा ५ लाखांची मागणी केली. कंटाळलेल्या फिर्यादीने ३० ऑगस्ट रोजी याबाबत मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे फिर्यादीने आरोपींना १ लाख रुपये दिल्यानंतर मूर्तिजापूर-अकोला रोडवरील टोल नाक्यावर दाम्पत्याला रंगेहात पकडण्यात आले. कारवाईत आरोपींकडून १ लाख रुपये रोख, दोन दुचाकी (किंमत अंदाजे १.५ लाख रुपये) व दोन मोबाइल (किंमत १३ हजार रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
 

Web Title: 'Give money or we will file a rape case' Honey trap on 51-year-old man from Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.