Farmers will get 'pension card'! | शेतकऱ्यांना मिळणार ‘पेन्शन कार्ड’!

शेतकऱ्यांना मिळणार ‘पेन्शन कार्ड’!

अकोला: प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत १८ ते ४० वर्ष वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या अल्पभूधारक लाभार्थी शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रतिमाह ३ हजार रुपये ‘पेन्शन’ मिळणार आहे. त्यासाठी या योजनेंतर्गत गावनिहाय लाभार्थी शेतक-यांच्या नोंदणीसाठी शिबिरे (कॅम्प) घेऊन, लाभार्थी शेतक-यांना पेन्शन कार्ड वाटप करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्हाधिका-यांना पत्राद्वारे दिले आहेत. त्यानुसार या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या राज्यातील पात्र लाभार्थी शेतक-यांना ‘पेन्शन कार्ड’ मिळणार आहेत.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना गत ९ ऑगस्टपासून देशभरात लागू करण्यात आली आहे. १८ ते ४० वर्षे वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेले राज्यातील सर्व अल्पभूधारक शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यासाठी पात्र आहेत. योजनेंतर्गत पात्र शेतक-यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रतिमाह ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यासाठी गाव पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये (सेतू) लाभार्थी शेतक-यांची नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीनंतर संबंधित शेतक-यांना लाभार्थी हिस्सा रकमेपोटी वयानुसार कमीत कमी ५० रुपये व जास्तीत जास्त २०० रुपये विमा हप्त्याची रक्कम संबंधित विमा कंपनीकडे जमा करावी लागणार आहे.

शेतक-यांना भराव्या लागणा-या विमा हप्त्याच्या रकमेत ५० टक्के रक्कम शासनामार्फत भरण्यात येणार आहे आणि वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी शेतक-यांना प्रतिमाह ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यासाठी योजनेंतर्गत गावनिहाय लाभार्थी शेतक-यांची नोंदणी करण्यासाठी शिबिरे (कॅम्प) घेऊन, पात्र लाभार्थी शेतक-यांना पेन्शन कार्ड वाटप करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांना १६ ऑगस्ट रोजी पत्राद्वारे दिले आहेत. त्यानुसार प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या राज्यातील पात्र लाभार्थी शेतक-यांना ‘पेन्शन कार्ड’ मिळणार आहेत.

 

Web Title: Farmers will get 'pension card'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.