Farmers in trouble; How to pay for Rabbi sowing? | शेतकरी अडचणीत; रब्बी पेरणीचा खर्च भागविणार कसा?
शेतकरी अडचणीत; रब्बी पेरणीचा खर्च भागविणार कसा?

- संतोष येलकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यात हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, जवळ पैसा नसल्याने, रब्बी पीक पेरणीचा खर्च भागविणार कसा, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
यावर्षीचा पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात विदर्भ-मराठवाड्यासह राज्यभरात कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन सडले असून, ज्वारीला कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. तसेच भात, भाजीपाला आणि फळ पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नाही. जवळ असलेला पैसा पीक लागवडीवर खर्च केला आणि त्यानंतर हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन अवकाळी पावसात बुडाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जवळ पैसा नसल्याच्या स्थितीत रब्बी हंगामातील पिकांची पेरणी, पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते व कीटकनाशकांचा खर्च भागविणार कसा, याबाबतची चिंता आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सतावत आहे.

नुकसान भरपाईच्या मदतीचाही पत्ता नाही!
अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यातील पीक नुकसानाचे पंचनामे तयार करण्याचे काम आटोपण्याच्या मार्गावर असताना, पीक नुकसान भरपाईची मदत अद्याप शासनामार्फत जाहीर करण्यात आली नाही. तसेच पीक नुकसान भरपाईचा शासन निर्णयदेखील काढण्यात आला नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारी मदतीचा अद्याप पत्ता नसल्याने, पीक नुकसान भरपाईची मदत मिळणार तरी केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

Web Title: Farmers in trouble; How to pay for Rabbi sowing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.