कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या टार्गेटसाठी महिलेची प्रसूती लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 16:32 IST2019-08-28T16:32:52+5:302019-08-28T16:32:56+5:30
महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्यास विलंब केल्याने स्त्री रुग्णालयात सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराबाबत कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या टार्गेटसाठी महिलेची प्रसूती लांबविली
- सचिन राऊत
अकोला: जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका शिल्पा नामक महिलेला प्रचंड कळा सुरू असतानाही प्रसूती करण्याऐवजी येथील डॉक्टरांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायची की नाही, असे प्रश्न विचारत तिची प्रसूती पाच ते सहा तास लांबविल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री घडला. महिलेच्या कुटुंबीयांनी आधी प्रसूती करा, अशी विनवणी केल्यावरही सदर महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्यास विलंब केल्याने स्त्री रुग्णालयात सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराबाबत कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला.
सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ स्तरावरून टार्गेट देण्यात आले आहे. ग्रामीण भागासह शहरात फिरून तशा प्रकारच्या ग्रामस्थ नागरिकांचा शोध घेण्यात यावा. त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी इच्छुक असलेल्यांचे समुपदेशन करावे आणि नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करून ही शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने उद्दिष्ट दिले आहे; मात्र आरोग्य विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना सोबत घेऊन रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाºया गर्भवती महिलांनाच वेठीस धरल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघड झाला. गर्भवती महिलांना प्रसूती करण्यापूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या होकारासाठी ‘कळा’ देण्याचे काम येथील डॉक्टरांनी केल्याचे समोर आले. महिलेच्या नातेवाइकांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी आग्रह धरला तर महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्याऐवजी ताटकळत ठेवल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाºयांनी शिल्पा नामक महिलेला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी तगादा लावून होकार येईपर्यंत या महिलेची प्रसूती लांबविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने रुग्णालय प्रशासनाच्या या कारभाराविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अॅमवेचे प्रोडक्ट विक्रीसाठी केली होती सक्ती
जिल्हा स्त्री रुग्णालयातील काही परिचारिकांनी रुग्णांना अॅमवे या कंपनीचे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी सक्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर एका महिलेचा शिशू शौचालयाच्या टाक्यातून गायब झाल्याचा जावईशोध रुग्णालय प्रशासनाने लावला होता. आता कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या होकारासाठी गर्भवती महिलांना वेठीस धरण्यात येत असल्याची माहिती आहे.
न विचारताच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
जिल्हा स्त्री रुग्णालय तसेच सर्वोपचार रुग्णालयात काही महिला रुग्णांना प्रसूतीसाठी दाखल केल्यानंतर त्यांना न विचारताच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकाराच्या तक्रारीही वरिष्ठापर्यंत करण्यात आल्या आहेत.