Election of Teacher constituency may be postponed! | शिक्षक मतदारसंघ निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता!

शिक्षक मतदारसंघ निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता!

- नितीन गव्हाळे
अकोला: अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जून, जुलै महिन्यात होणार होती; परंतु आता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक विभागाने मतदार नोंदणीची अधिसूचनासुद्धा काढली होती. आतापर्यंत विभागात ३४ हजारांवर शिक्षक मतदारांची नोंदणी झाली. इच्छुक उमेदवारसुद्धा प्रचाराला लागले होते; परंतु कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी लागल्यामुळे उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपुष्टात येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची अधिसूचनासुद्धा काढली होती. शिक्षक संघटनांकडून मतदार नोंदणीस प्रारंभसुद्धा करण्यात आला. मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांमधून आतापर्यंत ३४ हजार शिक्षक मतदारांनी नोंदणी केली आहे. इच्छुक उमेदवारांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षक मतदारांसोबत संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. दौऱ्यांचे नियोजन केले होते; परंतु अचानक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आणि शासनाने संचारबंदी लागू केली. शाळा, महाविद्यालयांना सुट्या जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या प्रचारास ब्रेक लागला. शिक्षकांसोबत संपर्क होत नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या नियोजनावर पाणी फेरल्या गेले आहे. कोरोनामुळे जूनमध्ये होणारी निवडणूकही लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने अद्याप अधिसूचना जारी केली नाही. अमरावती विधान परिषद शिक्षक मतदारसंघाची गतवेळची निवडणूक जून महिन्यात झाली होती. त्यानुसार मतदारसंघामध्ये नव्याने जून, जुलै महिन्यात निवडणुकीची शक्यता वर्तविली जात होती; परंतु कोरोनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


हे उमेदवार राहणार रिंगणात!
यंदाच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणामध्ये शिक्षक आघाडीचे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यासह विज्युक्टा व समविचारी संघटनांचे उमेदवार प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, शिक्षक महासंघाचे शेखर भोयर, शिक्षक भारतीचे दिलीप निंभोरकर, शिक्षक परिषदेचे राजकुमार बोनकिले, शिक्षक संघर्ष संघटनेच्या संगीता शिंदे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रकाश काळबांडे, शिक्षक संघाचे अ‍ॅड. किरण सरनाईक, पश्चिम विमाशिसंचे विकास सावरकर, महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे प्रा. नीलेश गावंडे उतरले आहेत. या सर्वांना त्यांच्या संघटनेकडून उमेदवारीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे.


शिक्षक मतदारसंघाचा कार्यक्रम लागू होईपर्यंत शिक्षकांची नोंदणी सुरू राहणार आहे; परंतु आता कोरोनामुळे मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर पडणार आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्यामुळे मतदारांसोबतच संपर्क तुटला आहे. निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे उमेदवार लक्ष देऊन आहेत.
-प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, प्रांताध्यक्ष, विज्युक्टा.

 

Web Title: Election of Teacher constituency may be postponed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.