मुसळधार पावसामुळे अकाेला महापालिकेची पाेलखाेल; रस्त्यांवर तुंबले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2022 10:47 AM2022-06-12T10:47:56+5:302022-06-12T10:48:01+5:30

Akola Municipal Corporation : शहरातील मुख्य रस्ते तसेच बाजारपेठेत नाल्यांमधील घाण पाणी तुंबल्याचे किळसवाने चित्र हाेते.

Due to torrential rains, Akala Municipal Corporation works unearthed | मुसळधार पावसामुळे अकाेला महापालिकेची पाेलखाेल; रस्त्यांवर तुंबले पाणी

मुसळधार पावसामुळे अकाेला महापालिकेची पाेलखाेल; रस्त्यांवर तुंबले पाणी

Next

अकाेला : शहरात शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या मान्सूनपूर्व नाले सफाइची पाेलखाेल झाली. शहराच्या विविध मुख्य रस्त्यांवर नाल्यांमधील घाण पाणी तुंबल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, या पाण्यातून वाट काढताना अकाेलेकरांची तारांबळ उडाली हाेती.

महापालिका प्रशासनाने मान्सूनपूर्व नाले सफाइची कामे निकाली काढल्याचा दावा केला हाेता. मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी नाले सफाईच्या नावाखाली स्वत:च्या तुंबड्या भरणाऱ्या कंत्राटदारांना चाप लावण्याच्या उद्देशातून क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर नाले सफाई करण्याचा निर्णय घेतला हाेता. या कामासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जेसीबी, इतर वाहनांसह मनपातील प्रशासकीय तथा खासगी सफाई कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात आले हाेते. नाले सफाईच्या मुद्यावर आयुक्तांनी सातत्याने क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेत त्यांच्याकडून आढावा घेतला असता, सर्वच झाेन अधिकाऱ्यांनी ९० टक्के नाले सफाईची कामे झाल्याचा दावा केला हाेता. झाेन अधिकाऱ्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवण्यात आला असला तरी शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाच्या कामाची पाेलखाेल झाल्याचे समाेर आले आहे. शहरातील मुख्य रस्ते तसेच बाजारपेठेत नाल्यांमधील घाण पाणी तुंबल्याचे किळसवाने चित्र हाेते. त्यातून वाट काढताना अकाेलेकरांना कसरत करावी लागली.

 

या रस्त्यांवर साचले पाणी

मुख्य रस्त्यालगतच्या नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा हाेऊ शकला नाही. परिणामी नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यांवर तुंबले. यामध्ये प्रामुख्याने जुने शहरातील डाबकी राेड, गांधी चाैक, टिळक राेड, खुले नाट्यगृह चाैक, जैन मंदिर परिसर, दाना बाजार, काेठडी बाजार, मटका बाजार, ताजनापेठ परिसर, मुख्य पाेस्ट ऑफीस चाैक, धिंग्रा चाैक, टाॅवर चाैक ते एसीसी मैदान पर्यंतचा परिसर, रतनलाल प्लाॅट चाैक, जठारपेठ चाैक ते उमरी राेड, अकाेटफैल पाेलीस स्टेशनसमाेरचा परिसर, सिंधी कॅम्प आदी परिसराचा समावेश आहे.

 

मुख्य रस्त्यालगतच्या नाल्यांकडे दुर्लक्ष

झाेन अधिकाऱ्यांनी नाले सफाई करताना मुख्य रस्त्यालगतच्या नाले सफाईकडे दुर्लक्ष केल्याचे यानिमित्ताने समाेर आले आहे. नाल्यांवरील धापे काढून साफसफाई करण्यासाठी झाेन अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसे निर्देश आयुक्त द्विवेदी देतील, अशी अकाेलेकरांना अपेक्षा आहे.

Web Title: Due to torrential rains, Akala Municipal Corporation works unearthed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.