वाडेगाव-माझोड रस्त्यावर ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 19:48 IST2021-04-13T19:46:15+5:302021-04-13T19:48:19+5:30
Accident News : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटला.

वाडेगाव-माझोड रस्त्यावर ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा मृत्यू
वाडेगाव: वाडेगाव-माझोड मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे..वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, २५ वर्षीय युवक ट्रक्टर घेऊन माझोडकडे जात असताना समोरील वाहनास बाजू देत असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, दि. १३ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली. अक्षय गजानन जंजाळ (रा. वाडेगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.
सिद्धार्थ नगर येथील रहिवासी असलेला अक्षय उर्फ बंटी गजानन जंजाळ (२५) हा गीट्टी आणण्यासाठी वाडेगावहून मझोडकडे ट्रॅक्टर घेऊन जात असताना अज्ञात मालवाहू वाहनाने कावा मारल्यामुळे अक्षयचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास वाडेगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पवार, गावंडे करीत आहेत. मृत युवकाच्या मागे आजोबा, आई-वडील, भाऊ असा बराच मोठा परिवार आहे. (फोटो)